Governor’s Instructions to Empower Agricultural Universities
कृषी विद्यापीठांना अधिक सक्षम करण्याच्या राज्यपालांच्या सूचना
कृषी विद्यापीठांच्या जमीन वापराबाबत लवकरच धोरण
मुंबई : कृषी हा देशाच्या तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्याच्या कृषी विकासात कृषी विद्यापीठांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांच्या विविध समस्यांचे निराकरण प्राधान्याने करून विद्यापीठांना अधिक सक्षम करण्याच्या सूचना राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे दिल्या.
राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक राजभवन येथे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीला कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, वित्त विभागाचे (व्यय) अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
विद्यापीठांच्या कुलगुरूंना विद्यापीठांमध्ये बांधकाम करण्यासाठी तसेच यंत्रसामग्री खरेदीसाठी ठरवून दिलेली निधीची कमाल मर्यादा फार पूर्वी ठरविण्यात आली असून कुलगुरुंचे वित्तीय अधिकार वाढवून देण्यासाठी शासन स्तरावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना राज्यपालांनी या बैठकीत केल्या. राज्यपालांनी सर्व कृषी विद्यापीठांमध्ये रिक्त असलेल्या अध्यापक तसेच बिगर शिक्षकांच्या पदांचा आढावा घेतला व रिक्त जागा भरण्याबाबत विद्यापीठ तसेच शासनातर्फे केल्या जात असलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली.
कृषी विद्यापीठांच्या जमीन वापराबाबत लवकरच धोरण – अनुप कुमार
राज्यातील कृषी विद्यापीठांकडे उपलब्ध असलेल्या जमिनींसंदर्भात विविध घटकांकडून मागणी होत असते. यासंदर्भात एक समग्र ‘जमीन वापर धोरण’ तयार करण्याबाबत शासन विचार करीत असल्याची माहिती कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार यांनी बैठकीत दिली. जागतिक हवामान बदलांमुळे राज्यात अतिवृष्टी व अनावृष्टीची वारंवारता वाढली आहे असे नमूद करून कृषी विद्यापीठांनी या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी लागवडीबाबत मार्गदर्शक प्रणाली तयार करावी अशी सूचना त्यांनी केली.
बैठकीत उच्च कृषी शिक्षण कायद्याची अंमलबजावणी करणे, कृषी वैज्ञानिक व विद्यार्थ्यांना विदेश दौऱ्यावर पाठविण्यासाठी कुलगुरूंना प्राधिकृत करणे, नोकरीत असलेल्या उमेदवारांना अध्ययन रजा देण्याबाबत अधिकार कुलगुरुंना देणे, खासगी कृषी महाविद्यालयांचे व्यवस्थापन सुधारणे, विद्यापीठांचा आकस्मिकता निधी वाढवणे, इत्यादी विषयांवर चर्चा झाली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणि व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय भावे यांनी बैठकीत आपापल्या विद्यापीठांच्या समस्या मांडल्या.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “कृषी विद्यापीठांना अधिक सक्षम करण्याच्या राज्यपालांच्या सूचना”