Veteran actor Jayant Savarkar passed away
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर याचं निधन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना श्रद्धांजली
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर याचं आज ठाण्यात निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. सावरकर यांच्यावर काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ७० हून अधिक वर्षे ते रंगभूमीवर कार्यरत होते. त्यांच्यामागे त्यांचा मुलगा कौस्तुभ आणि मुलगी सुवर्णा तसंच सुषमा असं कुटुंब आहे. अण्णा या नावानं मनोरंजन विश्वात ते ओळखले जात असत. अनेक कलाकार घडवण्याचं कामही त्यांनी केलं. शेवटच्या क्षणापर्यंत ते रंगभूमीवर काम करण्यासाठी सक्रिय होते.
मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वात सात दशकांहून अधिक काळ जयंत सावरकर कार्यरत होते. जयंत सावरकर यांचा जन्म १९३६ मधला. त्यांचं मूळ गाव गुहागर हे होतं. वयाच्या विसाव्या वर्षी 1954 पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. वयाच्या73व्या वर्षांपर्यंत त्यांच्या अभिनयाची कारकिर्द सुरूच राहिली.
जयंत सावरकर यांनी अनेक लोकप्रिय मराठी नाटकांत काम केलं होतं. त्यात एकच प्याला, तुझे आहे तुजपाशी,व्यक्ती आणि वल्ली, हिमालयाची सावली, अपराध मीच केला, अपूर्णांक, अलीबाबा चाळीस चोर, अल्लादीन जादूचा दिवा, अवध्य, आम्ही जगतो बेफाम, दिवा जळू दे सारी रात, वरचा मजला रिकामा, सूर्यास्त यांसारख्या अनेक मराठी नाटकांचा समावेश होता.
समांतर या सुहास शिरवाळकरांच्या कादंबरीवर आधारीत वेब सीरिजमध्ये त्यांनी ज्योतिष्याची भूमिका केली होती. पु.ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकावर आधारीत त्याच शीर्षकाच्या नाटकात त्यांनी अंतू बर्वा ही भूमिका साकारली होती. ती भूमिका लोकांच्या आजही स्मरणात आहे.
नाटकांबरोबरच सावरकर यांनी हिंदी, मराठी मालिका तसंच वेब सीरिजमध्येही काम केलं होतं. सावरकर यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.
सावरकर यांना अनेक पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. त्यात विष्णुदास भावे पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार, अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये जीवन गौरव पुरस्कारांचा समावेश आहे. मी एक छोटा माणूस हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना श्रद्धांजली.
अभिनयातील पिढ्यांना जोडणारा दुवा
आपल्या दमदार आणि कसदार अभिनयाने रसिकांच्या मनात घर करून राहिलेला, दोन पिढ्यांना जोडणारा ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावला आहे, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘जयंत सावरकर यांनी नानाविध चरित्र भूमिका सहजगत्या केल्या. हसतमुख व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाद्वारे त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिका या माध्यमातून आपल्या कसदार अभिनयचा ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने एक ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ते एक हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व होतं. आपल्या कसदार अभिनयानं त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप पाडली, अशा शब्दांत संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदरांजली वाहिली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर याचं निधन”