On the occasion of Revenue Week, inform the citizens about revenue services
महसूल सप्ताहाच्या निमित्ताने महसूल सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवा
– जिल्हाधिकारी डॉ.राजेश देखमुख
पुणे : महसूल सप्ताहाच्या निमित्ताने महसूल विभागाच्या विविध योजना व देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि यानिमित्ताने नागरिकांना सहभागी करून घेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहे.
राज्य शासनाच्यावतीने १ ऑगस्टपासून आयोजन करण्यात येत असलेल्या महसूल सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. १ ते ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी, नागरिक यांच्या सहभागाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. महसूल दिन सप्ताह शुभारंभ, युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसूल संवर्गातील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा संवाद तसेच महसूल सप्ताह सांगता समारंभ इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना डॉ.देशमुख यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात महसूल विभागामार्फत फेरफार अदालत, पोटखराब जमीन लागवडीखाली आणणे, पाणंद रस्ते अभियान, डिजीटल सातबारा असे अनेक चांगले उपक्रम राबविण्यात आले आहे. या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी. महसूल विभाग गतीमान आणि पारदर्शक करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबाबतही नागरिकांना अवगत करण्यात यावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिले आहेत.
महसूल सप्ताहानिमित्त गाव तिथे स्मशानभूमी/दफनभूमी मोहीम, चांगले काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार, दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण, नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी आवश्यक दाखल्यांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देणे, अधिकाधिक उमेदवारांना जात प्रमाणपत्राचे वितरण, शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार करणे, अनाथ आश्रमात न राहणाऱ्या अनाथ मुलांना प्रमाणपत्र देणे, नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या नागरिकांना दिलेल्या मदतीचा आढावा घेऊन पात्र लाथार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही, अतिदुर्गम गावात महसूल अदालत, ‘आपले सरकार’ पोर्टलवरील तक्रारी निकाली काढणे, संरक्षण दलातील सैनिकांच्या कुटुंबियांना विविध दाखल्यांचे वितरण आदी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com