Organized by the Office of the Chief Electoral Officer ‘Express Vote’ Competition
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचे आयोजन
वृत्तपत्रविद्या आणि कला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई : सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना आणि सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ हा असून या स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नालिजम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
या स्पर्धेत जाहिरातनिर्मिती, भित्तीपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तीनही स्पर्धाचे विषय आणि नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर स्पर्धाचे विषय असे आहेत : (१) युवा वर्ग आणि मताधिकारी, (२) मताधिकार लोकशाहीचा स्तंभ, (३) एका मताचे सामर्थ्य, (४) सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका / जबाबदारी, (५) लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकार, तीनही स्पर्धांचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी आहे. या स्पर्धांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.
या बक्षिसांचे स्वरूप असे आहे.
जाहिरात निर्मिती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक रु. १ लक्ष, दुसरे पारितोषिक रु. ७५ हजार, तिसरे पारितोषिक रु. ५० हजार रु. आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी १० हजार रुपयांची आहेत. भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक ५० हजार रु., दुसरे पारितोषिक २५ हजार रु. आणि तिसरे पारितोषिक १० हजार रु. आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५ हजार रुपयांची आहेत. घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक २५ हजार रु., दुसरे पारितोषिक १५ हजार रु व तिसरे पारितोषिक १० हजार रु. आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५,००० रुपयांची आहेत.
महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयांच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com