Follow up with the central government to make the deadline for reporting the information of crop loss to the insurance company 96 hours
पीक नुकसानाची माहिती विमा कंपनीला कळवण्याची मुदत 96 तास करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार
– मंत्री धनंजय मुंडे
मुंबई : शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला या नुकसानाची माहिती 72 तासांच्या आत देण्याचा नियम आहे. यात बदल करून किमान 96 तास इतकी मुदत देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्तर विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासांत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम मिळाली नसल्याबाबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना कृषीमंत्री श्री. मुंडे बोलत होते.
कृषीमंत्री श्री. मुंडे म्हणाले की, अतिवृष्टी सारख्या संकटाच्या काळात वीज पुरवठा खंडित असणे, इंटरनेटची सुविधा बंद असणे, मोबाईल नेटवर्क नसणे अशा प्रकारच्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत या सुविधा पूर्ववत होण्यास काही कालावधी लागतो. त्यामुळे 72 तासांच्या आत नुकसानीची माहिती देण्यास बहुतांश शेतकरी असमर्थ ठरतात. अशावेळी या कालावधीत आणखी काही तासांची वाढ करून हा कालावधी किमान 96 तास केला जावा, म्हणून केंद्र सरकार कडे मागणी करून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल.
सन 2022 च्या हंगामात एकूण विमाधारक शेतकऱ्यांना 3180 कोटी इतकी पीक विमा रक्कम मंजूर करण्यात आली असून त्यापैकी सुमारे 3,148 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे. तसेच उर्वरित शेतकऱ्यांची विम्याची रक्कम ही 1000 रुपये पेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा कमीत कमी एक हजार रुपये मिळावा, अशी शासनाची भूमिका आहे. त्यावर उपाय म्हणून यापुढे शेतकऱ्यांना विम्यापोटी मिळणारी रक्कम 1000 रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यात उर्वरित रक्कम राज्य शासन देईल व शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये पीक विमा हा निश्चित मिळेल, अशी घोषणाही मंत्री श्री. मुंडे यांनी केली.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, शशिकांत शिंदे, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com