Dr D. Y. Patil University’s 14th graduation ceremony concluded
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा पदवीदान समारंभ संपन्न
जगाची कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यासाठी तयार रहा- राज्यपाल
पुणे : जगातील अनेक देश त्यांना असलेली डॉक्टर, परिचारिका, अभियंते, कुशल कामगार अशा कुशल मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. स्नातकांनी या संधीचा फायदा घेत जगाच्या कोणत्याही भागात काम करण्यास तयार असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या १४ व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते कायनेटिक समूहाचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, प्राज इंडस्ट्रीज लि. चे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी आणि बेंगळुरू येथील रामय्या संस्था समूहाच्या गुणवत्ता हमी व उत्कृष्टता कक्षाचे प्रधान सल्लागार डॉ. पी. एन. राजदान यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र. कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरु डॉ. एन. जे. पवार, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले, स्वातंत्र्यानंतर प्रथमच आपण क्रांतिकारी असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारत आहोत. या धोरणाद्वारे अध्ययन प्रक्रीयेत गतिमानता आणण्याचा प्रयत्न आहे. यामुळे भारतातील उच्च शिक्षणाचा दर्जा आणखी उंचावणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध झाली आहे. भारत देश २०३५ पर्यंत शिक्षणासाठी सकल नोंदणी गुणोत्तराचे (जीईआर) ५० टक्के हे अपेक्षित लक्ष्य गाठेल, असा विश्वास आहे. आपल्या लोकसंख्येचे रुपांतरण संपत्तीमध्ये करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असेही राज्यपाल म्हणाले.
डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठातून विद्यार्थी आरोग्य विज्ञान, दंतचिकित्सा, जैवतंत्रज्ञान, बायोइन्फॉरमॅटिक्स, पूरक वैद्यकशास्त्र, नर्सिंग, आयुर्वेद आणि होमिओपॅथीचे पदवीधर इतर नियमित अभ्यासक्रमांसह पदवी मिळवत असल्याचा आनंद आहे. रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्थांमधील वैद्यकीय सेवेचा अनुभव स्नातकांना निष्णात डॉक्टर बनवेल, असा विश्वासही राज्यपाल बैस यांनी व्यक्त केला.
कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- एआय) आणि मशीन लर्निंगच्या उदयाच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतच बदल होणार आहेत. आज केवळ साक्षर असणे पुरेसे नाही तर एआय साक्षर असणे आवश्यक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ते शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या पद्धती, रोगाचे निदान आणि उपचार या दोन्हींवर परिणाम करणार आहे.
उर्वरित जगाच्या तुलनेत आपण एआयमध्ये मागे आहोत. परंतु देशातील युवा पिढी तंत्रज्ञानातील बदलांशी सहज जुळवून घेणारी असल्याने त्याचा भविष्यात लाभ होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या येणाऱ्या युगात आयुष्यभर आणि सतत शिकत रहावे लागेल. पुढे राहण्यासाठी आपल्या लोकांना कौशल्य, पुन: कौशल्यप्राप्ती आणि कौशल्ये उन्नत करण्यासाठी तयार असले पाहिजे. एकापेक्षा अनेक कौशल्ये शिकणे भारतीयांना एआय आणि मशीन लर्निंगमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून वाचण्यास मदत करेल, असेही राज्यपाल म्हणाले.
विद्यापीठाने आपले शिक्षण एआय आणि मशीन लर्निंगशी कशाप्रकारे अनुरूप करता येईल यासाठी पुढाकार घ्यावा. मानवी बुद्धिमत्ता कोणत्याही एआय प्रणालीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. एआयला सहानुभूती, प्रेमभावना नाहीत, ज्या मानवाकडे आहेत. या भावनांमुळेच तुम्ही समाजाची आणि देशाची सेवा करू शकता, असेही राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले. प्रत्येक तरुणाने जगातील एक तरी भाषा शिकली पाहिजे. देशातील कोणत्याही राज्यात आणि जगातील कोणत्याही भागात प्रवास करण्यासाठी सज्ज व्हावे, असा संदेशही त्यांनी दिला.
यावेळी कुलपती डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, एका संस्थेपासून प्रारंभ करुन संस्थेन ९ हून अधिक संस्था स्थापन केल्या. वैद्यकशास्त्र, नर्सिंग, दंतचिकित्सा, आयुर्वेद, होमिओपॅथी आदी अनेक विद्याशाखांचा विस्तार केला. उच्च गुणवत्तेमुळे विद्यापीठाला नॅक ‘ए++’ अधिस्वीकृती प्राप्त झाली आहे. विद्यापीठाच्या रुग्णालयाला अवयव प्रत्यारोपणाचा परवाना असून आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना आता अनेक संधी उपलब्ध झाल्या असून त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.
कुलगुरु डॉ. एन. जे. पवार यांनी स्वागत करून विद्यापीठ अहवाल सादर केला. त्यांनी सांगितले, विद्यापीठाने राष्ट्रीय संस्था रँकिंग फ्रेमवर्क अंतर्गत चांगली कामगिरी केली आहे. विद्यापीठ क्रमवारीमध्ये देशात ४६ वा क्रमांक तर वैद्यकीय क्षेत्रात १५ वा आणि दंतशास्त्र मध्ये ३ रा क्रमांक आहे. १ हजार ४०० पेक्षा अधिक संशोधन अहवाल विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संशोधन जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. २६ पेटंट प्रसिद्ध झाले आहेत. २ स्टार्टअप नोंदणीकृत झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. फिरोदिया, डॉ. चौधरी आणि डॉ. राजदान यांनीही मनोगत व्यक्त केले.
या समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या ३३ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले. विविध विद्याशाखेतील ४ हजार ९५ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १४ विद्यावाचस्पती (पीएच.डी.), ३ हजार १५ पदव्युत्तर पदवी, १ हजार ५५ पदवी आणि ११ पदविका या अशा एकूण ८ विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा पदवीदान समारंभ संपन्न”