350th Shiv Rajyabhishek year celebrations to unveil post stamp based on Shahaji Raje’s image tomorrow
३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त शहाजीराजेंच्या प्रतिमेवर आधारित पोस्ट तिकिटाचे उद्या अनावरण
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष समारोपानिमित्त ‘साद सह्याद्रीची, भूमी महाराष्ट्राची’ कार्यक्रम
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोप पर्वानिमित्त आणि ‘माझी माती माझा देश‘ या अभियाना निमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने शुक्रवार, दिनांक 18 ऑगस्ट रोजी ‘साद सह्याद्रीची, भूमी महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आणि 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त शहाजी राजे भोसले यांच्या प्रतिमेवर आधारित पोस्ट तिकीट अनावरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
राजभवन येथील दरबार हॉल मध्ये सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, मुंबईचे पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून वर्षभरात दहा लाखाहून अधिक विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये ऑगस्ट क्रांती मैदान येथे या अमृतमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ कार्यक्रम, त्याचबरोबर, पुणे आणि वर्धा येथे उद्घाटनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कोल्हापूर येथे महाताल महोत्सवाचे आयोजन, 36 जिल्ह्यातील कारागृहात बंद्यांसाठी कार्यक्रम, स्वराज्य महोत्सवाचे आयोजन, घरोघरी तिरंगा उपक्रमाचे आयोजन, अनामवीरांना आदरांजली हा सांस्कृतिक कार्यक्रम, आझाद हिंद गाथा या उपक्रमांतर्गत 75 महाविद्यालयात 75 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
राज्यात ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्तही विविध उपक्रम सांस्कृतिक कार्य विभागाने घेतले. दुर्गराज रायगडावर आयोजित करण्यात आलेला राज्याभिषेकाचा सोहळा, त्यासाठी राज्यभरातील 1008 पवित्र ठिकाणाहून आणलेले जलकलश, शिवकालीन सुवर्ण होन नाण्याचे विशेष टपाल तिकीट प्रकाशन, ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, राज्याभिषेकाचे महत्व अधोरेखित करणारे बोधचिन्हाचे प्रकाशन असे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त शहाजीराजेंच्या प्रतिमेवर आधारित पोस्ट तिकिटाचे उद्या अनावरण”