Public Works Minister Dadaji Bhuse inspected the Mumbai-Pune Expressway (Missing Link) project
सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी केली मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्पाची पाहणी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्प सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन-मंत्री दादाजी भुसे
पुणे : सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील नवीन मार्गिकेच्या (मीसिंग लिंक) प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, मुख्य अभियंता राजेश पाटील, अधीक्षक अभियंता सतीश श्रावगी,कार्यकारी अभियंता अजित पाटील, उप अभियंता विशाल भोईटे आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. भुसे म्हणाले, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील १३.३ किलोमीटर लांबीचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या अंतर्गत १.६७ किलोमीटर आणि ८.९२ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे आहेत. या प्रकल्पाचे सुमारे ७५ ते ८० टक्के काम पूर्ण झाले असून सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी सुरक्षितेतच्या दृष्टीकोनातून जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ही कामे करीत असतांना या विषयातील तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यात येत आहे. या मिसिंग लिंकवर १८० मीटर उंचीचा सर्वात उंच पूल आणि सर्वात जास्त रुंदीचा बोगदा बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे लोणावळा, खंडाळा परिसरातील वाहतुक कोंडी कमी होणार असून प्रवाशांच्या वेळेत व इंधनात बचत होणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंक प्रकल्प, नियोजित नागपूर-गोवा महामार्ग असे विविध महामार्ग पूर्ण करुन वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाला जोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. असे अनेक प्रकल्प प्राधान्यक्रमाने कार्यान्वित होत असल्यामुळे राज्याची विकासाला चालना मिळते आहे असेही श्री. भुसे म्हणाले.
पाहणी पूर्वी कुसगाव येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. पाटील यांनी मिसिंग लिंक प्रकल्पाच्या कामाविषयी सादरीकणाद्वारे माहिती दिली. यामध्ये प्रकल्पाची लांबी, रुंदी, उंची, किंमत, तसेच मार्गिका, वाहनाची वेग मर्यादा, वाहतूक कोंडी, सुरक्षितता, पाण्याचा निचरा, कामाचा दर्जा, आधुनिक तंत्रज्ञान आदीबाबत माहिती देण्यात आली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com