Timely completion of infrastructure projects in the state
राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करा
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मंत्रालय वॉर रूममध्ये दहा महत्त्वाच्या प्रकल्पांचा घेतला आढावा
मुंबई : राज्यात सुरू असलेले मेट्रोसह विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच सिंचन प्रकल्पांना तातडीने गती देऊन कालबद्धरित्या हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच मुंबईतील वाहतूक कोंडीवरील उपाययोजनेसाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे ट्विन टनेल या नवीन संकल्पनेचा वापर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला सर्वेक्षणाचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील वॉर रूममध्ये राज्यातील दहा महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. आज झालेल्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो, मुंबई मेट्रो, सिंचन प्रकल्प, समृद्धी महामार्गालगत इकॉनॉमिक झोन या प्रकल्पांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ही कामे वेळेत पूर्ण झाल्यास राज्यातील नागरिकांची मोठी सोय होण्याबरोबरच औद्योगिक विस्ताराला तसेच ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची तातडीने पूर्तता करत प्रकल्पांना वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.
मुंबईत वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी ग्रेड सेपरेटर टाकून वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले. वाहतूक कोंडीतून सुटका करण्याकरिता ‘ट्विन टनेल’ या नवीन संकल्पनेचा वापर करण्याबाबत मुंबई महापालिकेने सर्वेक्षण करावे याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग जोडण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी मुंबई मेट्रो मार्गिका ४,चार ए, आणि ११ साठी मोगरपाडा येथे डेपो करण्याकरिता भूसंपादनाच्या विषयाबाबत आढावा घेण्यात आला. मिठी नदी विकास व प्रदूषण नियंत्रण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्तांना यावेळी देण्यात आल्या. ठाणे-भिवंडी- कल्याण या मुंबई मेट्रो पाचच्या मार्गिकेसाठी कशेळी येथील भूसंपादनाबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला.
दक्षिण मुंबई परिसरातील महत्त्वाचे रस्ते, पदपथांवर होणारे अतिक्रमण काढून रस्ते, चौक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले. समृद्धी महामार्गालगत इकोनॉमिक झोन करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. निम्न पैनगंगा प्रकल्प मार्गी लावण्याबाबत जलसंपदा विभागाला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सूचना दिल्या.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करा”