Complete the work of Lohgaon Upazila Hospital by the end of next January
लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम येत्या जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई :- पुणे जिल्ह्यातील लोहगाव परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लोहगाव येथील 6 एकर जागेत 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थानांचे बांधकाम करण्यात येत आहे. सद्यस्थितीत 90 टक्के बांधकाम पूर्ण झाले असून रुग्णालयाची उर्वरित कामे येत्या जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पुणे जिल्ह्याच्या लोहगाव (ता. हवेली) येथील उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थान बांधकामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात घेतला. बैठकीस आमदार सुनील टिंगरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, पुण्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून लोहगाव परिसरातील जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहेत. रुग्णालयाचे बांधकाम, आतील फर्निचरसह इतर सोयीसुविधा, रुग्णांवर उपचारासाठी साधने, आरोग्ययंत्रणा, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी,असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com