Builders should take the initiative to register unorganized workers
बांधकाम व्यावसायिकांनी असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा
-उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे : असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी शासनाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शासकीय योजनांचा कामगारांना लाभ मिळावा यासाठी मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेने पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्यावतीने ‘पुणे शहर व परिसरात होणाऱ्या संभाव्य औद्योगिक विकास व पायाभूत सुविधांचा बांधकाम क्षेत्रावर होणारा परिणाम’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे एस.आर.कुलकर्णी, नंदू घाटे, प्रमोद पाटील, अंकुश आसबे आदी उपस्थित होते.
उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले, बांधकाम क्षेत्रामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत. बांधकाम व्यावसायिक सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करुन देतात. बांधकाम क्षेत्रातील असंघटीत कामगारांनाही घरे उपलब्ध करुन देण्यासाठी संघटनेने पुढाकार घ्यावा. संघटनेने त्यांच्या क्षेत्रातील कामगारांची, महिला कामगारांची नोंदणी करावी. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा फायदा मिळेल. मराठी माणसाने मराठी माणसाला व्यवसायामध्ये सहकार्य करावे अशी अपेक्षा श्री.सामंत यांनी व्यक्त केली. बांधकाम क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार श्रीरंग बारणे यांनी पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत असून याचा लाभ बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना होणार असल्याचे सांगितले.
संघटनेचे अध्यक्ष नंदू घाटे यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या कार्याची माहिती दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा”