Remove the calamity on farmers and let there be satisfactory rains throughout the state
बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे
– मुख्यमंत्री यांची भीमाशंकराकडे प्रार्थना
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊदे; राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
पुजेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, भावीक श्रद्धेने आणि भक्तीभावाने येथे दर्शनाला येत असतात. मी दरवर्षाप्रमाणे यावर्षीही श्रावणी सोमवारी दर्शनासाठी आलो आहे. येथे लाखो भक्त येत असल्याने शासनाने १४८ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत त्यातील ६८ कोटी विविध सुविधांवर खर्च करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही अशा सर्व मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील. परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्नानगृहाची व्यवस्था करण्याचे तसेच परिसरातील आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, खेड उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसिलदार तथा देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त संजय नागटिळक, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, दत्तात्रय कौदरे, रत्नाकर कोडीलकर आदी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे”