Chef Vishnu Manohar’s resolution to make 6 thousand kg of Shira in Ayodhya
आयोध्येत ६ हजार किलो शिरा बनवण्याचा शेफ विष्णू मनोहर यांचा संकल्प
महिलांसाठी मंगळागौर आणि पाककला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संप्पन
समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांना नेहमीच सहकार्य -पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन
पुणे : व्यक्तीची पोटाची भूक लागल्यावर, त्याला मन:शांतीची भूक निर्माण होते. त्यामुळे समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसाठी नेहमीच सहकार्य असल्याचा हा
संकल्प पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. तसेच, आपलं आराध्य दैवत प्रभू श्री रामांच्या अयोध्येतील भव्य मंदिराच्या लोकार्पणप्रसंगी सहा हजार किलोचा शिरा बनविणार असल्याचा संकल्प प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी यावेळी व्यक्त केला.
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड मतदारसंघात श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत कोथरुडमधील महिलांसाठी मंगळागौर आणि पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, ॲड. मिताली सावळेकर, अमृता देवगावकर, उमा गाडगीळ, अनुराधा एडके यांच्या सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीची मनाची भूक भागल्यानंतर, मन:शांतीची भूक निर्माण होते. समाजाला दिशा देणारे वेगवेगळे उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे असे समाजप्रबोधनाचे विविध कार्यक्रम राबविण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. याअंतर्गत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले, आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धा,श्रावण महिन्यानिमित्त मंगळागौर आणि पाककला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भविष्यातही असे समाजप्रबोधनाचे विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या श्रावण महोत्सवाचे कौतुक करुन प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर म्हणाले की, आजपर्यंत मी विविध विक्रम केले. मात्र, आयोध्येत प्रभू श्रीरामांची सेवा करणं, हे स्वप्न आहे. त्यामुळे आयोध्येत प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या लोकार्पणप्रसंगी सहा हजार किलोचा शिरा बनवून, तो प्रसाद म्हणून वाटणार असल्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सरचिटणीस मुरलीधर मोहोळ म्हणाले की, चंद्रकांतदादा यांनी कोथरुडचे लोकप्रतिनिधी झाल्यापासून प्रत्येक स्तरातील व्यक्तीसोबत भावनिक नातं निर्माण केलं आहे. अनेक उपक्रम राबविले आहेत. वास्तविक लोकप्रतिनिधी भौतिक सुविधा विकासाची कामे, करणारा नेता असतो. पण यासोबतच सर्वांसाठी काम केलं आहे. त्यामुळे कोथरुड मधील प्रत्येक व्यक्तीला आधार देण्याचं काम केलं, असे गौरवोद्गार काढले.
यावेळी प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. मंजुश्री खर्डेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले. मंजुश्री खर्डेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “आयोध्येत ६ हजार किलो शिरा बनवण्याचा शेफ विष्णू मनोहर यांचा संकल्प”