The Government is committed to the all-round development of the College of Engineering and Technology
अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध
-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
माजी विद्यार्थी नियामक मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे यांच्यावतीने आयोजित अभिमान पुरस्कारांचे वितरण
माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येक सेमिस्टर मध्ये दोन तास लेक्चर दिल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाचा चांगला फायदा होईल
पुणे : अभियांत्रिकी क्षेत्रात नावलौकीक असलेल्या आणि १७० वर्षाची परंपरा असणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
माजी विद्यार्थी नियामक मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे यांच्यावतीने आयोजित अभिमान पुरस्कार वितरण समारंभात श्री. पाटील बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुधीर आगाशे, माजी विद्यार्थी नियामक मंडळाचे अध्यक्ष भरत गीते, बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, सचिव डॉ. सुजित परदेशी, नियामक मंडळाचे सदस्य, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
पुरस्कार्थींचे अभिनंदन करून श्री. पाटील म्हणाले, अभिमान पुरस्कार विजेत्यांचा संस्थेलाही अभिमान आहे. विद्यापीठाने केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांना न देता त्यांनी संस्कारमूल्य जपण्याचेही मार्गदर्शन करावे. देशात नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी होत असून मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान चांगल्याप्रकारे होऊन त्यांची संशोधनाची वृत्ती वाढण्यास मदत होईल. तसेच नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायभिमूख शिक्षणावर देखील भर देण्यात येत असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
अभियांत्रिकी महाविद्यालयाला शासनाने स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. त्यानंतर येथे आवश्यकतेनुसार विविध अभ्यासक्रम घेतले जात असून त्याचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे. विद्यापीठाकडे स्पर्धेची भावना असली पाहीजे. तंत्रज्ञान विद्यापीठाचे भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये रूपांतर करण्यासाठी विद्यापीठाने ज्ञान-तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत सहभागी होऊन शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करावी. विद्यापीठाचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, असेही श्री.पाटील म्हणाले.
श्री. आगाशे म्हणाले, विद्यापीठातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची कौटुंबिक पार्श्वभूमी नसते. माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येक सेमिस्टर मध्ये दोन तास लेक्चर दिल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाचा चांगला फायदा होईल. विद्यापीठाला जागतिक दर्जा मिळण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. गीते आणि श्री. चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी अशिष अचलेरकर, अरूण कुदळे, विवेक फणशीकर, चेतन धारिया, डॉ. रवी भटकळ व डॉ. विजय पटेल यांना अभिमान पुरस्काराने पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी माजी विद्यार्थी नियामक मंडळाच्या पुस्तकाचे प्रकाशनही श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध”