Planning of Pune Municipal Corporation for Environment-Friendly Ganeshotsav
पर्यावरण पूरक गणेशोत्सवाकरिता पुणे महानगरपालिकेचे नियोजन
सर्व नागरिकांना नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन
पुणे : सालाबादप्रमाणे सन २०२३ मधील सार्वजनिक गणेशोत्सव दिनांक १९/०९/२०२३ ते २८/०९/२०२३ या कालावधीत साजरा करण्यात येणार असून या गणेशोत्सव कालावधीत पुणे महानगरपालिकेमार्फत तयारी करण्याचे काम चालू आहे.
पुणे महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिकांना नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याकरीता गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदाद्वारे मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात येणार आहे.
१५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण ४२ बांधलेले हौद, एकूण २६५ ठिकाणी ५६८ लोखंडी टाक्या या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची सोय करण्यात येणार आहे.
१५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण २५२ ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे/ गणेशमूर्ती दान केंद्रे उभारण्यात आली असून नागरिकांनी नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता जास्तीत जास्त प्रमाणात मूर्ती दान करावे याबाबत क्षेत्रिय कार्यालयांमार्फत जनजागृती करण्यात येत आहे.
क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व कृत्रिम हौद व गणेशमूर्ती संकलनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी २५६ निर्माल्य कलश/ कंटेनरची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पुणे महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या सर्व यंत्रणाची सविस्तर माहिती www.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोणीही निर्माल्य नदीपात्र, तलावात टाकू नये असे आवाहन मा.महापालिका आयुक्त यांनी सर्व पुणेकर नागरिकांना केले आहे.
गणेशोत्सव २०२३ मध्ये पुणे महानगरपालिका व विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत पुनरावर्तन उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये ECOEXIST संस्था, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था व इतर विविध स्वयं सेवी संस्थांमार्फत गणेश विसर्जनानंतरची शाडूची माती संकलित करून त्याचा पुर्नवापर केला जाणार आहे.
शाडू माती एक मर्यादित संसाधन असून या मातीच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. मातीच्या मूर्तींचे विसर्जन केल्यामुळे गाळ निर्माण होऊन नदीपात्रात गाळ साठल्याने सागरी जीवनावर परिणाम होतो. या शाडू मातीचा पुर्नवापर केल्यास मूर्तीकारांना मूर्ती/माती परत देऊन त्यांना मदत करता येऊ शकते. पुनरावर्तन उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती व शाडू माती संकलनाच्या केंद्राविषयीची सविस्तर माहिती www.punaravartan.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्याच गोष्टींचा समावेश होतो. त्यामध्ये प्लास्टिक, थर्माकॉल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, मुर्त्या किंवा त्यांचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ टाकू नयेत. हे प्रासादिक निर्माल्य एकत्र करून त्याचे खत बनवून शेतक-यांना देण्यात येते, म्हणूनच या प्रासादिक निर्माल्याचे पावित्र्य भंग पावेल अशा कुठल्याही वस्तू किंवा इतर कचरा निर्माल्यात टाकू नये असे आवाहन पुणे महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.
कमिन्स इंडिया कंपनीच्या CSR च्या माध्यमातून निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रिय कार्यालयांमार्फत संकलित केलेल्या गणेश मूर्तींचे पुर्नविसर्जन करणेची व्यवस्था वाघोली येथील खाणीमध्ये तीन पाळ्यांमध्ये आवश्यक सेवक व पर्यवेक्षकीय अधिकारी नेमून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आली आहे.
सर्व क्षेत्रिय कार्यालयांना गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात सर्वत्र सार्वजनिक स्वच्छता राखली जाण्याच्या अनुषंगाने सर्व सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, ओपन प्लॉट, क्रॉनिक स्पॉट, नदीपात्र, नदीघाट, विसर्जन हौदांची ठिकाणे, सार्वजनिक गणेश मंडळांचे परिसर या सर्व ठिकाणी स्वच्छता राखणेबाबत सूचित करण्यात आले आहे.
वाघोली येथील खाणीच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूक करण्याबाबत नगररोड-वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयास कळविण्यात आले आहे. वाघोली येथील खाणीच्या ठिकाणी रखवालदार नियुक्त करण्याबाबत सुरक्षा विभागास कळविण्यात आले आहे.
क्षेत्रिय कार्यालयाच्या मागणीनुसार आवश्यक गाड्यांची उपलब्धता करणेबाबत मोटार वाहन विभाग कळविण्यात आले आहे.
गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन सन्मानपूर्वकरित्या वाघोली येथील खाणीमध्ये करण्यात येणार असलेबाबत मा. जिल्हाधिकारी, मा.प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मा. पोलीस आयुक्त तसेच मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण तसेच यांना कळविण्यात आले आहे.
वाघोली येथे खाणीमध्ये गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन करणेबाबत परिमंडळ निहाय दिवस ठरवून देण्यात आलेले असून त्यानुसार गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन केले जाणार आहे.
पर्यावरणपूरकरीत्या गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले असून पुणे महानगरपालिकेच्या सोशल मिडीया माध्यमाद्वारे, VMDs, होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स इ.द्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिकेमार्फत गणेशोत्सव कालावधीमध्ये एकूण ४०० मोबाईल टॉयलेट व १५० फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पुणे महापालिकेने पुणे शहरामधील ११८३ सार्वजनिक स्वच्छतागृहांची (CT/PT) माहिती टॉयलेटसेवा app मध्ये उपलब्ध करून दिली आहे. टॉयलेटसेवा app मध्ये पुणे शहरामधील कुठलाही पत्ता टाकून पुणे महापालिकेची सार्वजनिक स्वच्छतागृहे शोधता येतील. गणेशोत्सवाच्या आधी पुणे शहरामधील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये QR Code स्टिकर्स लावले जातील. टॉयलेटसेवा app चा वापर करून नागरिकांनी ह्या माहितीचा फायदा घ्यावा, सार्वजनिक स्वच्छतागृहांविषयीचा आपला अभिप्राय टॉयलेटसेवा app मधून रेटिंग्सच्या मार्फत आणि issues रिपोर्ट करून कळवावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
अग्निशमन केंद्राच्या वतीने गणेश विसर्जनासाठी मुठा नदीपात्रालगत असणाऱ्या विसर्जन घाटांवर येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव दलाकडील प्रत्येकी १ फायरमन दु. १.०० वा. ते रात्री ९.०० वा. या वेळात आणि प्रत्येकी २ जीवरक्षक तीन पाळ्यांमध्ये नियुक्त करण्यात येणार आहेत. सदरील कर्मचाऱ्यांवर नियंत्रणासाठी या घाटांवर अग्निशमन अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात येणार असून गणेशोत्सवाचे कालावधीतील विविध दिवशींचे विसर्जन आणि दि. २८/०९/२०२३ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशीचे संपूर्ण विसर्जन संपेपर्यत संबंधीत अधिकारी सदरील विसर्जन घाटांवर उपस्थित राहून नियंत्रण ठेवणार आहेत.
पुणे अग्निशमन दलाचे विनम्र आवाहन
अग्निशमन दल आपल्या सुरक्षेसाठी कटीबध्द असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाच्या दुरध्वनी क्र. १०१ वर संपर्क साधावा.
- गणेश मुर्तीचे विसर्जन करताना लहान मुलांना नदी, कॅनॉल, विहीरी, तळे यापासून दूर उभे करुन त्यांचेजवळ जबाबदार व्यक्तीने थांबावे.
- नाव/होडीतून गणपती विसर्जन करताना त्यात क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींनी बसू नये, तसेच बसलेल्या व्यक्तींनी नाव/होडीस अपघात होईल असे वर्तन करुन नये.
- पुणे मनपाच्या वतीने नदीकाठी नेमण्यात आलेल्या ‘‘जीवरक्षक” सेवकांकडून शक्यतो गणेश मुर्तीचे विसर्जन करवून घ्यावे.
- एखादी व्यक्ती पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास, त्याची कल्पना नदीकाठी नेमलेल्या जीवरक्षकांना तातडीने द्यावी.
- मद्यपान केलेल्या अवस्थेत नदीपात्र, तलाव, कॅनॉल, विहीर, तळे इत्यादींजवळ जाऊ नये.
- पावसामुळे नदीकाठचा परिसर निसरडा झालेला असल्यास अशा ठिकाणी काळजीपूर्वक वावरावे.
- अनुचित प्रकार, अनुचित घटना टाळण्यासाठी कृपया अधिकृत घाट, मनपाने विविध ठिकाणी बांधलेले विसर्ज़न हौद व मनपाच्या क्षेत्रिय कार्यालयांनी गणेश विसर्जनासाठी केलेल्या व्यवस्थेच्या ठिकाणी कृपया गणेश मुर्तीचे विसर्जन करावे.
आपत्कालीन संपर्क दुरध्वनी क्रमांक १) ०२०-२५५०१२६९ २) ०२०-२५५०६८०० (/१ /२ /३/४)
संपर्क मोबाईल क्रमांक १) गणेश सोनुने , आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पुणे महानगरपालिका मोबाईल नं. ९६८९९३१५११
२) देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, मोबाईल नं. ८१०८०७७७७९ / ०२०२६४५१७०७ (१०१)
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “पर्यावरण पूरक गणेशोत्सवाकरिता पुणे महानगरपालिकेचे नियोजन”