Activities like ‘Media Samvad’ are useful for building a holistic personality
समग्र व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी ‘मीडिया संवाद’ सारखा उपक्रम उपयुक्त
– कुलगुरू डॉ.रवी चिटणीस यांचे प्रतिपादन
‘पुणे महानगरपालिका पीएमसी केअर मार्फत ‘मीडिया संवाद २०२३ : नावीन्य… शहर घडामोडींचे!’ या विशेष कार्यक्रम
पीएमसी केअर’च्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद
पुणे : ‘प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संवाद हे प्रगतीचे सर्वात मोठे साधन आहे. मित्र, आई, वडील यांच्याशी आपला संवाद हा नेहमी होतच असतो. असा संवाद स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्याशी जनतेचा होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका पीएमसी केअर तर्फे कॉलेज विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला ‘मीडिया संवाद’ हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. समग्र व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी असे संवाद नक्कीच उपयोगी ठरतात,’ असे प्रतिपादन एमआयटी विश्व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवी चिटणीस यांनी केले.
पुणे महानगरपालिका पीएमसी केअर मार्फत आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘मीडिया संवाद २०२३ : नावीन्य… शहर घडामोडींचे!’ या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. चिटणीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पुणे महानगरपालिका माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप, मनपा शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी उबाळे मॅडम यांची उपस्थिती होती.
पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या महाविद्यालय विद्यार्थ्यांसह मीडिया क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तसेच या क्षेत्राविषयी रुची असणाऱ्या नागरिकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ‘पत्रकार… आज आणि उद्याचे!’, ‘वर्तमान काळात मीडिया हाऊसेसमधील ‘विचार स्वातंत्र्य’, ‘सोशल मीडिया / न्यूज मीडिया – स्पीड / ऑथेंटिसिटी’ अशा ३ विषयांवर परिसंवाद घेण्यात आला. तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. चिटणीस म्हणाले की, ‘पीएमसी केअर या ॲपवरून नागरिकांना मिळणारा रिस्पॉन्स खूपच चांगला आहे. कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला जर नागरिकांसोबत योग्य संवाद नसेल तर सुरळीत सेवा देण्यात अडचणी येऊ शकतात. अशावेळी नागरिकांसोबत संवाद वाढवा, या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेने सुरू केलेले असे उपक्रम नक्कीच उपयुक्त आहेत. हा उपक्रम म्हणजे इतर महानगरपालिकेंनी आदर्श घेण्यासारखा असा आहे. येणाऱ्या काळात अशा उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य अशा विविध विषयांवर संवाद साधले जावेत. विविध विषयांवर उहापोह होणे सर्वांसाठीच उपयुक्त ठरेल,’ असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राहुल जगताप यांनी पीएमसी केअर या ॲपबाबत माहिती दिली.
‘पत्रकार…आजचे आणि उद्याचे!’
कार्यक्रमात पहिला परिसंवाद ‘पत्रकार…आजचे आणि उद्याचे!’ या विषयावर रंगला. यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीजच्या विभागप्रमुख डॉ.माधवी रेड्डी, सावित्रीबाई फुले विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम रानडे इन्स्टिट्यूटचे विभागप्रमुख प्रा.डॉ. संजय तांबट, ज्येष्ठ करिअर काउन्सिलर डॉ. श्रीराम गीत, अमुक तमुक पॉडकास्ट नेटवर्कचे ओंकार जाधव यांनी मार्गदर्शन केले. डॉ. तांबट म्हणाले,’आता माध्यमांचे विश्व फार मोठे झाले आहे. प्रिंट, रेडिओ, टीव्ही पासून सुरू झालेला हा प्रवास ओटीटी पर्यंत येऊन पोहचला आहे. भारतामध्ये पहिले वर्तमानपत्र १७८० साली सुरू झाले. तर, पहिले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. मात्र त्याकाळी माध्यमांची गरज वेगळी होती. तर आजची माध्यमांची गरज ही खूप वेगळी आहे. ज्याप्रमाणे माध्यमांमध्ये बदल झाला, त्याप्रमाणे पत्रकारांनी काळानुरूप बदलण्याची आवश्यकता आहे.’ डॉ.माधवी रेड्डी यांनी माध्यम क्षेत्रातील विविध बाबीं बाबत माहिती दिली. ‘रिसर्च, प्रोडक्शन, मार्केटिंग, ब्रँडिंग अशा विविध बाबीसाठी कंटेंट व प्लॅटफॉर्म उपयुक्त असतो,’ असेही त्यांनी सांगितले. ओंकार जाधव यांनी सांगितले की, ‘मीडिया आता केवळ वन वे कम्युनिकेशनचे साधन राहिले नसून, ते टू वे कम्युनिकेशनचे साधन झाले आहे. लोकांना यामध्ये स्वतः चा जास्तीत जास्त सहभाग हवा आहे. आता कंटेंट कोणता हवा, हे ग्राहक ठरवतात. यूट्यूब सारखा प्लॅटफॉर्म तर प्रत्येकासाठी ओपन आहे. येथे लोकांचा सुद्धा तात्काळ फीडबॅक मिळत असतो.’ तर डॉ. गीत यांनी विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्रातील करिअर बाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील पदवी घेतली तरी तुम्ही या क्षेत्रात येऊ शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःच्या डोक्यातून येणाऱ्या कल्पना, विचार स्वतःच्या शब्दात लिहिता येणे आवश्यक आहे. पत्रकार बनण्यासाठी एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे चौकसपणा,’ असेही ते म्हणाले. ‘बदलत्या काळानुसार पत्रकारांनीही स्वतःला अपडेट करण्याची आवश्यकता आहे,’ असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. सकाळच्या संपादिका शितल पवार यांनी या परिसंवादाच्या मॉडरेटर म्हणून जबाबदारी पार पडली.
पत्रकारिता करताना कुठे थांबावे, हे कळणे महत्वाचे
‘मीडिया संवाद २०२३’ या विशेष कार्यक्रमात ‘वर्तमान काळात मीडिया हाऊसेसमधील विचार स्वातंत्र्य’ या विषयावर दुसरा परिसंवाद रंगला. कायदेतज्ज्ञ ॲड. रमा असीम सरोदे, दैनिक पुढारीचे विशेष प्रतिनिधी आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल आणि मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाचे असोसिएट डीन धीरज सिंह यांनी मार्गदर्शन केले. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क प्रत्येकाला मिळाला आहे. पत्रकारितेच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा आहे. परंतु मूलभूत हक्काच्या नावाखाली पत्रकारिता करत असताना कुठे थांबले पाहिजे, हे समजणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे,’ असे मत या परिसंवादातून व्यक्त करण्यात आले. ॲड. रमा सरोदे म्हणाल्या, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्काचा अर्थ काळानुरूप बदलत गेला आहे. लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे, हा सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कातील एक भाग आहे. प्रत्येक पत्रकाराने पत्रकारिता करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले पाहिजे; पण त्यांनी आपली सीमारेषा ओलांडली जाणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. कुठे नेमके थांबले पाहिजे, ते देखील समजणे तितकेच महत्त्वाचे आहे.’ पांडुरंग सांडभोर यांनी सांगितले की,’ पत्रकारितेचे शिक्षण घेताना आपल्याला जे शिकवले जाते व जेव्हा आपण प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन पत्रकारिता करतो, यामध्ये खूप अंतर वाटते. कारण प्रत्यक्षात पत्रकारिता करताना खूप काळजी घ्यावी लागते. अनेकदा तुम्हाला बातमी देणारे सोर्स तुमचा उपयोग करून घेत नाही ना, हे देखील तपासणे गरजेचे आहे. बातमी मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. आपल्या बातमीमुळे दुसऱ्यांच्या हक्कावर गदा येणार नाही, याची काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. अनुभवातून पत्रकार या गोष्टी शिकत असतात.’ धीरज सिंह यांनीही परिसंवादात मार्गदर्शन करताना लोकशाहीच्या चार स्तंभातील मीडिया हा एक महत्वपूर्ण स्तंभ असल्याचे सांगितले. या चार स्तंभांमुळे देश प्रगतीच्या वाटेने चालू शकतो. त्यामुळे या चारही स्तंभांना तितकेच महत्त्व आहे,’असेही ते म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीजच्या डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी परिसंवादाच्या मॉडरेटर म्हणून जबाबदारी पार पडली.
पत्रकारितेत तंत्रज्ञानाला समजून घेणे महत्वाचे
‘सोशल मीडिया / न्यूज मीडिया : स्पीड / ऑथेंटिसिटी’ या विषयावर तिसरा परिसंवाद झाला. ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. समीरन वाळवेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रानडे इन्स्टिट्यूटचे सहाय्यक प्राध्यापक योगेश बोराटे, झी २४ तासचे रिपोर्टर अरुण म्हेत्रे, पुणे प्लस मुख्य संपादिका रेणुका सूर्यवंशी ही माध्यम क्षेत्रातील दिग्गज मंडळी या परिसंवादात सहभागी झाली होती. ‘आगामी काळात तंत्रज्ञानाला समजून घेऊन, ते शिकून पत्रकारिता क्षेत्रात पुढे जाता येऊ शकते,’ असे मत या परिसंवादात मांडण्यात आले. डॉ. समीरन वाळवेकर म्हणाले, ‘आता तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. माध्यम क्षेत्रात काम करताना, हे तंत्रज्ञान कसे वापरावे? हे शिकणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही हे शिकला, तर तुम्हाला माध्यम क्षेत्रात पुढे जाण्यासाठी नक्कीच फायदा होईल. प्रत्येक तंत्रज्ञानाचे एक व्याकरण असते, ते आत्मसात केले तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. तंत्रज्ञानाचा वापर हा छंदासोबतच व्यावसायिकतेसाठीही करणे आता काळाची गरज बनली आहे.’ म्हेत्रे यांनी सांगितले की, ‘काळानुरूप तंत्रज्ञान बदलत चालले असून त्यासोबत माध्यम ही बदलले आहे. त्यानुसार आपणही माध्यम क्षेत्रात येताना स्वतःला वेळोवेळी बदलले पाहिजे. सत्यता पडताळणीला महत्त्व दिले पाहिजे. त्यासाठी आपली सद्सद विवेक बुद्धी जागृत ठेवणे गरजेचे आहे.
सध्याच्या काळात वार्तांकन करण्याचा स्पीड खूपच वाढला आहे, त्याला तंत्रज्ञान हे सर्वात मोठे कारण आहे.’ याप्रसंगी योगेश बोराटे म्हणाले की, ‘पूर्वीच्या काळी एखाद्या बातमीसाठी न्युज पेपरची वाट पहावी लागत होती; पण आता सोशल मीडियामुळे तत्काळ बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. अशा काळात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करणे गरजेचे असून त्यानुसार वाटचालही सुरू झालेले आहे.’ तर, रेणुका सूर्यवंशी यांनी सोशल मीडिया ब्रॉडकास्टिंग बाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘माध्यम क्षेत्रामध्ये सोशल मीडिया ब्रॉडकास्टिंग हा सुद्धा आजच्या काळातील महत्त्वाचा मुद्दा झालाय. यामुळे एखादी बातमी वेगाने आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य होते; पण सोशल मीडिया ब्रॉडकास्टिंगचा वापर करत असताना कामाचा स्पीड वाढवण्याची कला अवगत करणे ही तेवढेच आवश्यक आहे.’ ज्येष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन यांनी या परिसंवादाचे मॉडरेटर म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता मुळे-चौधरी यांनी केले, तर अनिकेत सिंग यांनी आभार मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “समग्र व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी ‘मीडिया संवाद’ सारखा उपक्रम उपयुक्त ”