संसदेच्या विशेष अधिवेशनात जुन्या संसद भवनाला निरोप

Hadapsar News, Hadapsar Latest News, हडपसर मराठी बातम्या

Farewell to Old Parliament House in Special Session of Parliament

संसदेच्या विशेष अधिवेशनात जुन्या संसद भवनाला निरोप

संसदेची जुनी इमारत संविधान सदन म्हणून ओळखली जाणार

Prime Minister Narendra Modi प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनात आज जुन्या संसद भवनाला निरोप देण्यात आला. आजपासून संसदेचं कामकाज, नव्यानं उभारलेल्या संसद भवनात सुरु झालं. स्वातंत्र्यप्राप्तीपासून गेली ७५ वर्ष जुन्या संसद भवनाची इमारत अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार ठरली असून या वास्तूला आता संविधान भवन असं नाव द्यावं, अशी सूचना, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित निरोप समारंभात केली. या वास्तूचा सन्मान कधीही कमी होता कामा नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गेल्या ७५ वर्षात विविध क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचा आढावा प्रधानमंत्र्यांनी घेतला.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड,लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यावेळी व्यासपीठावर होते. या कार्यक्रमानंतर प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्व खासदार नव्या संसद भवनाकडे रवाना झाले. आणि लोकसभेचं कामकाज नव्या वास्तूतल्या सभागृहातून सुरु झालं. नवीन सभागृहात नवीन उत्साह आणि नवीन विचार घेऊन काम करु मात्र जुन्या वास्तूतल्या चांगल्या पंरपरा पुढे घेऊन जाऊ, असा विश्वास सभापती ओम बिर्ला यांनी व्यक्त केला. त्यानंतर महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु झाली.

केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी विधेयक सभागृहात मांडलं. केंद्रीय मंत्रिमंडळाने कालच या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली. त्यानंतर लोकसभेचं आजचं कामकाज तहकूब करण्यात आलं. जुन्या संसदभवनाच्या मध्यवर्ती सभागृहाला संविधान सदन म्हणून ओळखलं जाईल, अशी घोषणा राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी केली.

नवीन संसद भवनात कामकाज हलवण्याच्या काही तास आधी, संसद सदस्य आज जुन्या संसद भवनाच्या आतील प्रांगणात सामूहिक छायाचित्रासाठी जमले. राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांचे संयुक्त छायाचित्र काढण्यात आले. त्यानंतर राज्यसभा खासदारांचे सामूहिक छायाचित्र आणि नंतर लोकसभा खासदारांचे सामूहिक छायाचित्र काढण्यात आले.

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा पहिल्या रांगेत बसले होते. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, दोन्ही सभागृहातील पक्षांचे नेते आणि लोकसभा आणि राज्यसभेचे महासचिव समोरच्या रांगेत बसले होते.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
भारतीय मानक ब्युरोने देशभरातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन केले 6467 मानक क्लब 
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *