Inauguration of the largest surgical intensive care unit in a government hospital
शासकीय रुग्णालयातील सर्वात मोठ्या शस्त्रक्रिया अतिदक्षता विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन
वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना क्लासरुममध्ये बसून शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण पाहता येणार
मुंबई : ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राज्यातील शासकीय रुग्णालयातील सर्वात मोठ्या शस्त्रक्रिया अतिदक्षता विभागाचे आणि नूतनीकरण केलेल्या मॉड्यूलर शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आमदार यामिनी जाधव उपस्थित होत्या. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले, ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज.जी. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुश्रीफ यांनी रुग्णालय प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी अतिदक्षता कक्ष आणि मॉड्यूलर शस्त्रक्रिया गृह हे रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त असून त्याचा लाभ गरजू रुग्णांना नक्कीच होईल, असे सांगितले. जे. जे. रुग्णालयात येत्या काळात विविध उपकरणांनी सुसज्ज, अशा अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जे. जे. रुग्णालय, मुंबई, ससून रुग्णालय, पुणे, शासकीय रुग्णालय, छत्रपती संभाजी नगर, शासकीय रुग्णालय नागपूर येथे लवकरच मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपण विभागाची सुरुवात करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व शासकीय रुग्णालय हे गरजू रुग्णांना अहोरात्र रुग्णसेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेत, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज.जी. समूह रुग्णालयामध्ये सुरु करण्यात आलेले सर्जिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट हे ३४ अद्ययावत खाटांनी सुसज्ज असून त्यामध्ये वेगळा आयसोलेशन कक्ष, बायोमेडिकल वेस्ट कक्ष तथा निगेटिव्ह प्रेशर रुमची ही सोय असणार आहे. त्याचप्रमाणे नूतणीकरण करण्यात आलेली मॉड्यूलर शस्त्रक्रियागृह ही सर्व अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असून ऑटोमॅटिक पद्धतीने वापरण्याजोगी असेल. या शस्त्रक्रियागृहमधून वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना क्लासरुममध्ये बसून शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “शासकीय रुग्णालयातील सर्वात मोठ्या शस्त्रक्रिया अतिदक्षता विभागाचे उद्घाटन”