India among the world’s top five healthcare equipment manufacturers,
जगातील पहिल्या पाच आरोग्यसेवा उपकरणे उत्पादकांमध्ये भारताचा समावेश, भारताच्या उत्पादनांची किंमत तुलनेने कमी – केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
नवी दिल्ली : उच्च तंत्रज्ञान आधारित वैद्यकीय उपकरणांच्या जागतिक स्पर्धेत भारत जगातील पहिल्या पाच आरोग्यसेवा उत्पादकांमध्ये समाविष्ट झाला असून भारताची उत्पादने तुलनेने कमी खर्चाची असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी काल सांगितले. भारत जीव रक्षक उच्च-जोखीम वैद्यकीय उपकरणे तयार करत आहे परंतु त्याची किंमत जगातील इतर उत्पादनांच्या तुलनेत अगदी कमी आहे, असेही त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली येथे कन्सोर्टियम ऑफ ॲक्रेडिटेड हेल्थकेअर ऑर्गनायझेशन (CAHO) द्वारे आयोजित 8 व्या CAHOTECH, वार्षिक आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा तंत्रज्ञान परिषदेत डॉ जितेंद्र सिंह उद्घाटनपर भाषणात बोलत होते.
वैद्यकीय उपकरण उत्पादन क्षेत्र हे देशातील वाढीची मोठी क्षमता असलेल्या उदयोन्मुख क्षेत्रांपैकी एक मानले जाते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भारताला उत्पादन केंद्र बनवण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलत आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
“भारत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपकरणांचे जागतिक केंद्र बनण्यासाठी सज्ज असून 2050 पर्यंत बाजाराची उलाढाल सध्याच्या 11 अब्ज डॉलर्स (अंदाजे 90,000 कोटी रुपये) वरून 50 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे,” अशी माहिती डॉ. सिंह यांनी दिली.
“जागतिक बाजारातील सध्याच्या 1.5 टक्क्यांवरून, पुढील 25 वर्षांत भारताचा बाजार हिस्सा 10-12 टक्क्यांपर्यंत वाढेल” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वैद्यकीय उपकरण उत्पादन क्षेत्राला मोदी सरकारने प्राधान्य क्षेत्र म्हणून निश्चित केले आहे आणि हे सरकार स्वदेशी उत्पादन परिसंस्था मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
“भारताला वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण 2023 आणि वैद्यकीय उपकरणांसाठी निर्यात प्रोत्साहन परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय, ग्रीनफिल्ड आणि ब्राउनफिल्ड सेटअप तसेच वैद्यकीय उपकरण पार्कचा प्रचार’ या दोन्ही योजनांमध्ये स्वयंचलित मार्गांतर्गत 100% परदेशी थेट गुंतवणूक वैद्यकीय उपकरण संशोधन आणि उत्पादनाला चालना देते. असेही डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
“स्वदेशात बनवलेली जागतिक दर्जाची वैद्यकीय उपकरणे भारतीय रुग्णांना त्यांच्या आयात केलेल्या समकक्ष उत्पादनांच्या किमतीच्या तुलनेत अंदाजे एक चतुर्थांश ते एक तृतीयांश किमतीत उपलब्ध होत आहेत. ही बाब वैद्यकीय उपकरणे तसेच वैद्यकीय व्यवस्थापनात स्वावलंबी होण्यासाठी पंतप्रधान मोदींची आत्मनिर्भर दृष्टी सफल होत असल्याचे प्रतिबिंबित करते,” असेही ते म्हणाले.
“देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 70% लोकसंख्या 40 वर्षांखालील असलेल्या देशात आणि आजचे तरुण भारत @2047 चे प्रमुख नागरिक बनत असताना प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि व्यापक प्रमाणात तपासणी या गोष्टी आपल्या अर्थव्यवस्थेसाठी पंतप्रधानांनी ठरवून दिलेला अपेक्षित वाढीचा दर साध्य करण्यात मदत करेल, असे डॉ. सिंह म्हणाले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “जगातील पहिल्या पाच आरोग्यसेवा उपकरणे उत्पादकांमध्ये भारताचा समावेश”