Measures taken by the National Highways Authority to avoid disputes at toll booths
टोल नाक्यांवर होणारे वाद टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उपाययोजना
नवी दिल्ली : प्रवासी आणि टोलनाके संचालक यांच्यामध्ये होणारे वाद टाळण्यासाठी आणि टोल प्लाझावर ‘एनएचएआय’ म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने उपाय योजना करण्यात येणार आहे. यासाठी प्रवासी आणि टोलनाके संचालक या दोघांच्याही दृष्टीने हितकारक ठरेल, अशी प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली आहे.
या नवीन कार्यप्रणालीचे कर्मचारी आणि रस्ते वापरकर्त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी टोल जमा करणाऱ्या एजन्सींकडून कठोर अंमलबजावणी आणि पालन यांची सुनिश्चिती करण्यासाठी या तपशीलवार मानक कार्यप्रणालीमध्ये एनएचएआयच्या क्षेत्रीय कार्यालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट करण्यात आली आहे.
याशिवाय, एनआयएआयच्यावतीने टोल नाक्यांवर ‘Toll par Calm’ म्हणजेच टोलनाक्यांवर शांतता, अशी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत एनआयएआयने टोलनाक्यांवरील कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या रागाचे व्यवस्थापन कसे करावे त्याचबरोबर ग्राहकांचे समाधान करून , त्यांना आनंद कसा द्यावा, याचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे.
यासाठी व्यावसायिक मानसशास्त्रज्ञांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. अशाप्रकारचे पहिले प्रशिक्षण सत्र हरियाणातील मुरथळ टोलनाका येथे आयोजित करण्यात आले होते. आता देशभरातील इतर टोल नाक्यांवरही असे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.
टोल गोळा करणारी एजन्सी मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची कर्तव्ये पार पाडत आहे की नाही , हे एनआयएआयची क्षेत्रीय कार्यालये सुनिश्चित करतील. तर टोल गोळा करणारी एजन्सी हे सुनिश्चित करेल की, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी नावाचा बिल्ला असलेला, एनएचएआयने ठरवलेला गणवेश परिधान केला आहे की नाही. तसेच रस्त्याच्या वापरकर्त्याने अनियंत्रित वर्तन केल्यास, मार्गिका पर्यवेक्षकाने हस्तक्षेप करून समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही परिस्थितीत, टोल नाक्यावरील कर्मचारी वर्गाने चिथावणीखोर भाषा वापरू नये किंवा हिंसाचाराचा अवलंब करू नये. गंभीर प्रसंग निर्माण झाला तर, टोलनाका अधिकारी स्थानिक पोलिसांची मदत घेऊ शकतात आणि समस्या कायम राहिल्यास किंवा वाढल्यास एफआयआर दाखल करू शकतात. पोलिसांकडे अशा घटनांची तक्रार करण्यासाठी पुरावा म्हणून कर्मचारी व्हिडिओग्राफी करू शकणार आहेत.
प्रवाश्याने शारीरिक हिंसाचार केला किंवा टोल नाक्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले तर कोणतीही घटना टोल गोळा करणाऱ्या एजन्सीद्वारे पोलिस आणि संबंधित एनएचएआय प्रकल्प अंमलबजावणी विभागाला सर्व आवश्यक कागदपत्रांसह / पुराव्यासह ताबडतोब कळविण्यात यावी, असे प्रमाणित कार्यप्रणाली मध्ये नमूद केले आहे.
एनएचएआय क्षेत्रीय कार्यालये हे सुनिश्चित करतील की, टोल गोळा करणाऱ्या एजन्सीकडे टोल नाक्यामध्ये येथे असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पोलिस सत्यापन दिले आहे. याव्यतिरिक्त, टोल गोळा करणार्या एजन्सीने टोल नाका कर्मचाऱ्यांना रस्ता वापरकर्त्यांशी सौजन्याने वागण्याचे निर्देश द्यायचे आहेत.
टोलनाका टोलच्या मुद्यावरुन रस्ते वापरकर्ते आणि टोल नाका कर्मचाऱ्यांमध्ये वाद घडत आहेत. काही प्रकरणांमध्ये होणारे कडाक्याचे भांडण, मारामारीमध्ये परिवर्तित होतात. मानक कार्यप्रणाली जारी केल्याने अशा घटना कमी होण्यास मदत होईल आणि महामार्ग वापरकर्ते आणि टोल नाका अधिकारी अशा दोघांनाही दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडण्यास या प्रमाणित कार्यप्रणालीमुळे मदत होईल.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “टोल नाक्यांवर होणारे वाद टाळण्यासाठी ‘एनएचएआय’ कडून उपाययोजना”