The Olympic Committee session will bring an Olympic combination opportunity for India
ऑलिंपिक समितीचे अधिवेशन भारतासाठी ऑलिंपिक संयोजनाची संधी घेऊन येईल
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
चार दशकानंतर भारतात होणाऱ्या १४१ व्या अधिवेशनासाठी ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाचे स्वागत
मुंबई : ऑलिंपिक क्रीडा स्पर्धां सर्वसमावेशक असते. ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अशा या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे मुंबईत होणारे अधिवेशन भारतासाठी ऑलिंम्पिक संयोजनाची संधी घेऊन येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे १४१ वे अधिवेशन १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. भारताला ४० वर्षांनंतर दुसऱ्यांदा या अधिवेशनाचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. या अधिवेशनासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे कार्यकारी मंडळ मुंबईत दाखल झाले. या कार्यकारी मंडळाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे स्वागत केले.
या दोघांनीही हे अधिवेशन संस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच यातून ऑलिंपिकशी निगडीत विविध स्पर्धांच्या संयोजनाची संधी भारताला मिळेल ,अशी आशाही व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्या नेतृत्वाखालील या कार्यकारी समितीच्या शिष्टमंडळात सदस्य तथा रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती नीता अंबानी, मार्क ॲडम्स, ख्रिस्टेन क्लाई, मरीना बारामिया, मोनिका श्रेर, टिना शर्मा यांचा समावेश होता.
या कार्यकारी मंडळाचे स्वागत करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ऑलिंपिक समितीचे हे अधिवेशन महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईसाठी मोठी महत्त्वाची संधी आहे. यातून मुंबईची आंतरराष्ट्रीय शहराचा लौकिक आणखी बळकट होईल. समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक आणि अधिवेशनासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. भारताने या आधीही अशा भव्य क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची क्षमता सिद्ध केल्याचाही पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस या दोघांनीही कोट्यवधी भारतीयांच्या क्रिकेट प्रेमींसाठी या खेळाचाही भविष्यात ऑलिंपिक मध्ये समावेश केला जाईल अशी आशा व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या अधिवेशनाच्या निमित्ताने भारताचे सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील स्थान आणखी बळकट होईल.आमच्यासाठी ही गौरवास्पद संधी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतात ऑलिंपिक स्पर्धांच्या संयोजनाचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न सत्यात येईल, अशी आशा या निमित्ताने निर्माण झाली आहे. अतिथी देवो भव अशी आमची संस्कृती आहे. यातून खेळ आणि आमच्या राज्याच्या क्रीडा संस्कृतीच्या लौकिकात भर पडेल. या अधिवेशनाच्या संयोजना करिता महाराष्ट्राकडून सर्व त्या सुविधा तसेच सहकार्य केले जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच ऑलिंपिझम या संकल्पनेतून पुणे येथे ऑलिंपिक म्युझियम साकारण्यात येत असल्याचेही सांगितले. रिलायन्स फाऊंडेशनच्या ओव्हिईपी – ऑलिंपिक व्हॅल्यू एज्युकेशन प्रोग्रॅम या कार्यक्रमाचे देखील त्यांनी कौतुक केले.
ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष श्री. बाख म्हणाले की, या अधिवेशनाच्या संयोजनाच्या निमित्ताने आम्हाला मुंबई आणि महाराष्ट्राच्या आदरातिथ्याचा अत्यंत आनंददायी अनुभव घेता येत आहे. आपले राज्य आघाडीचे राज्य आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. आपण आर्थिक तसेच व्यावसायिक विकासासोबतच क्रीडा धोरणाबाबतही आग्रही आहात याचे मोठे समाधान आहे. म्हणूनच आज आशियाई क्रीडा स्पर्धांत भारत आणि त्यातही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकाची चांगलीच कमाई करून दिली आहे, हे लक्षात येते. विशेषत वंचित घटकातील मुलांनी यात लक्षणीय यश मिळवले आहे, याचे समाधान आहे. आमच्या ऑलिंपिक समितीच्या सोशल मीडियाच्या प्रतिसादात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, हेदेखील निष्पन्न झाले आहे. शिक्षण आणि खेळाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा असलेले चांगले जग निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच ४० वर्षांनंतर भारतात होणारे हे अधिवेशन ऐतिहासिक ठरेल असा विश्वास आहे.
समितीच्या सदस्य तथा रिलायन्स फाऊंडशेनच्या अध्यक्ष श्रीमती अंबानी यांनी समितीचे अधिवेशन मुंबईत होत असल्याचा सर्वाधिक आनंद असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, मुलांचे शिक्षण आणि खेळ हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचविण्यासाठी करता येतील, ते सर्व प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. श्रीमती अंबानी यांनी मराठीतूनही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की मुंबईने मला भरभरून दिले आहे. सर्व काही दिले आहे. माझे शालेय शिक्षण इथेच झाले. लग्न झाले, मी आई झाले. आता आजी देखील इथेच झाले. त्यामुळे मला मुंबई शहरासाठी जे काही करता येईल ते करण्याची इच्छा आहे.
या प्रसंगी अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा पाटणकर-म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी उपस्थित होते.
१५ ते १७ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान होणारे हे अधिवेशन महाराष्ट्राच्या क्रीडा लौकिक आणि आदरातिथ्याला साजेसे भव्य दिव्य राहील, अशी तयारी करण्यात येत आहे. अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन रविवारी १४ ऑक्टोबर २०२३ रोजी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधील ग्रँड थिएटर येथे होणार आहे. अधिवेशनाच्या आधी १२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “ऑलिंपिक समितीचे अधिवेशन भारतासाठी ऑलिंपिक संयोजनाची संधी घेऊन येईल”