Strict action ordered against adulterating food vendors
अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्या विक्रेत्यावर कडक कारवाईचे आदेश
अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाची आढावा बैठक
पुणे : नागरिकांचे आरोग्य व जनहित विचारात घेवून नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ अन्न प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्या विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.
व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे आयोजित अन्न व औषध प्रशासनच्या पुणे विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे, सह आयुक्त (औषधे) एस. व्ही. प्रतापराव, तसेच पुणे विभागातील अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
मंत्री श्री. आत्राम म्हणाले, सणासुदीच्या दिवसात नागरिकांचा कल विविध मिठाई पदार्थ खरेदी करण्याकडे असतो. अशावेळी नागरिकांना भेसळ मुक्त, स्वच्छ पदार्थ कसे मिळतील हे पाहवे. हॉटेलचे किचन स्वच्छ असल्याबाबत वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. कार्यालयात येणाऱ्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही करावी. सध्या ऑनलाईन खरेदीवरही नागरिकांचा कल वाढत आहे, त्यावर देखरेख ठेवावी. कॉस्मेटिक, अॅलोपॅथिक, आयुर्वेदिक उत्पादकांची तपासणी वारंवार होणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
अन्न व औषध प्रशासनाच्या बळकटीकरणासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील. बाह्य यंत्रणेमार्फत 60 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. प्रशिक्षण आणि प्रयोगशाळेच्या इमारतीसाठी निधी मंजूर झाला आहे. वाहनांचीही पुर्तता बाह्य यंत्रणेतून करण्यात येईल. व्यपगत झालेली पदे पुर्नजिवित करण्याची कार्यवाही सूरू असून विभागाचा आकृतीबंद सुधारित करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री श्री.आत्राम यांनी दिली.
काही ठिकाणी कार्यालयाच्या जागेचा प्रश्न असून त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावा. अन्न व औषध प्रशासनास दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त कामे करावीत. प्रशासनाच्या काही अडी अडचणी असतील त्या सोडविण्यात येतील, त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पुणे विभागातील अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्या विक्रेत्यावर कडक कारवाईचे आदेश”