Sarvajanik Ganeshotsav is the best medium to carry forward the thoughts and work of Chhatrapati Shivaraya
सार्वजनिक गणेशोत्सव हे छत्रपती शिवरायांचे विचार, कार्य पुढे नेण्याचे उत्तम माध्यम
– सुधीर मुनगंटीवार
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २०२३ पारितोषिक वितरण मुंबईत संपन्न
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव हे छत्रपती शिवरायांचे कार्य व विचार पुढे नेण्याचे उत्तम माध्यम आहे. एकविसाव्या शतकात सार्वजनिक गणेशोत्सवाचे अधिक महत्व आहे. त्यामुळे हा उत्सव अधिकाधिक वैचारिक प्रबोधन करणारा व समाजाभिमुख व्हावा यासाठी शासन सर्वतोपरी सहाय्य करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रवींद्र नाट्यमंदिर येथे मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार संजय गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर, अकादमीच्या सल्लागार समितीच्या सदस्य श्वेता परुळेकर, सांस्कृतिक कार्य विभागाच्या माजी उपसचिव विद्या वाघमारे आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी मंत्री श्री.मुनगंटीवार आणि मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय विजेते आणि जिल्हास्तरीय विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. अकोला येथील श्री खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास प्रथम, सांगली जिल्ह्यातील तिरंगा गणेशोत्सव मंडळ (यशवंतनगर, विटा, ता. खानापूर), आणि तृतीय पुरस्कार पुणे जिल्ह्यातील मार्केट यार्ड मित्रमंडळ (मंचर आंबेगाव) यांनी राज्यस्तरीय अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. प्रथम क्रमांक विजेत्यांना पाच लाख, द्वितीय क्रमांक २ लाख ५० हजार आणि तृतीय पारितोषिक विजेत्यांना १ लाख रुपये देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील ६३९ मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पुढील वर्षी अधिकाधिक सहभाग या स्पर्धेसाठी मिळेल. गणेश उत्सव हा वैचारिक उत्सव व्हावा. सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून एकता, समतेच चित्र समाजासमोर जावे ही अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रधान सचिव श्री. खारगे म्हणाले की, गणेश मंडळे विविध सामाजिक कामे करत असतात. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे शासनाचे काम आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ही पुरस्काराची संकल्पना आपण राबविली. गणेश उत्सव प्रबोधनाचे माध्यम म्हणून ही मंडळे काम करीत आहेत, ही कौतुकाची बाब असल्याचे ते म्हणाले.
यावेळी जिल्हास्तरीय विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमादरम्यान भैरी भवानी परफॉर्मिग आर्टस् यांचे सादरीकरण असलेला ‘गणराज रंगी नाचतो’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसचिव श्रीमती राऊत यांनी केले, तर आभार श्रीमती जोगळेकर यांनी मानले.
दरम्यान, या स्पर्धेतील खालील जिल्हानिहाय विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “सार्वजनिक गणेशोत्सव हे छत्रपती शिवरायांचे विचार, कार्य पुढे नेण्याचे उत्तम माध्यम”