Special Industrial Training Institute for Handicapped at Latur
लातूर येथे दिव्यांगासाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था
– कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई : राज्यातील दिव्यांगांसाठी स्वतंत्र विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था हरंगुळ (बु.) जि.लातूर येथे सुरू करण्यात आली असून, संवेदना या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत दिव्यांगांच्या दृष्टीने अडथळा विरहीत इमारत आहे. सुसज्ज दिव्यांग अद्यावत कार्यशाळा, यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. राज्यातील दिव्यांगांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊन व प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मान्यतेने राज्यातील दिव्यांगांसाठी स्वतंत्र विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था हरंगुळ (बु.) जि.लातूर येथे संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे केवळ देशातच नव्हे, तर जगभरात विविध स्वरुपाची तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. औद्योगिक उद्योगांना त्यांच्या मागणीप्रमाणे प्रशिक्षण व गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ पुरविणारी संस्था म्हणजे आयटीआय अशा संस्थांमध्ये प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगार संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. दिव्यांगांकरीता भारत सरकारने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ (आरपीडी अॅक्ट २०१६) निर्माण केला आहे. या प्रमाणे एकूण लोकसंख्येच्या ८ ते १० टक्के दिव्यांगांची संख्या आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यात दिव्यांगांकरीता स्वतंत्र आयटीआय सुरु करावयाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्ती आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा, दिव्यांग व्यक्तींच्या कुटुंबाचे पुनर्वसन व्हावे, समाजातील मुख्य प्रवाहामध्ये दिव्यांगांनी यावे याकरीता ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभी करण्यात आली आहे.
संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हरंगुळ (बु.), जि.लातूर या संस्थेत राज्य तथा केंद्र शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली असून सन २०२३ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. व्यवसाय निहाय प्रवेशपात्र दिव्यांगाने प्रवेशासाठी संस्थेशी संपर्क साधावयाचा आहे. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ड्रेस मेकींग, कम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा) हे व्यवसाय सुरु करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी टीसी, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला, नॉनक्रिमीलेअर सर्टीफिकेट, उत्पन्नाचा दाखला, डोमिसीअल सर्टीफिकेट, पासपोर्ट साईझ फोटो, आधारकार्ड या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “लातूर येथे दिव्यांगासाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था”