Former Indian cricketer Bishan Singh Bedi passes away
भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांचे निधन
नवी दिल्ली : भारताचे महान क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे सोमवारी दिल्लीत निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. दोन आठवड्यांपूर्वी बेदींवर शस्त्रक्रिया झाली होती आणि तेव्हापासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता अंगद बेदी आहे, ज्याने अभिनेत्री नेहा धुपियाशी लग्न केले आहे.
बिशनसिंग बेदी यांनी भारतीय फिरकीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून दिला . बेदी यांनी भारताकडून ६७ कसोटी सामने खेळले होते. या ६७ कसोटी सामन्यांमध्ये बेदी यांनी २६६ बळी मिळवले होते. त्याचबरोबर बेदी हे १० वनडे सामनेही खेळले होते. या १० वनडे सामन्यांमध्ये बेदी यांनी सात बळी मिळवले होते.
बिशनसिंग बेदी यांनाही भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. १९७६ मध्ये त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. महान क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्या जागी बेदी यांना कर्णधार बनवण्यात आले. कर्णधार म्हणून त्यांचा पहिला विजय १९७६च्या दौऱ्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध मिळाला होता.
मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिकेत ३-२ आणि पाकिस्तान दौऱ्यावरील कसोटी मालिकेत २-०ने पराभूत झाल्यानंतर त्यांना कर्णधारपदावरून दूर करण्यात आले. त्यांच्यानंतर सुनील गावसकर कर्णधार झाले.
बेदी यांनी 1969-70 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाता कसोटीत एका डावात 98 धावांत सात विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. तर, 1977-78 मध्ये पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 194 धावांत सामन्यात एकूण 10 विकेट्स घेतल्या होत्या. 1976 मध्ये कानपूर कसोटीत त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध कसोटीतील एकमेव अर्धशतक झळकावले होते.
तसेच आपल्या संपूर्ण कारकिर्दीत बेदी यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल 1560 विकेट्स घेतल्या आहेत.
बेदी यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच ते मनिंदर सिंग आणि मुरली कार्तिक सारख्या अनेक प्रतिभावान फिरकीपटूंचे मार्गदर्शक देखील होते.
बेदी, इरापल्ली प्रसन्ना, बीएस चंद्रशेखर आणि एस. वेंकटराघवन यांच्यासह भारतीय फिरकी गोलंदाजीच्या इतिहासात एका प्रकारच्या क्रांतीचे शिल्पकार होते. भारताचे फिरकी हे प्रमुख अस्त्र आहे हे जगाला दाखवून दिले ते बेदी यांनी. बेदी यांनी प्रसन्ना आणि चंद्रशेखर यांच्या साथीने जगाला आपल्या फिरकीच्या तालावर चांगलेच नाचवले होते. आपल्या डावखुऱ्या फिरकीच्या जोरावर त्यांनी फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले होते. डावखुऱ्या गोलंदाजीची फिरकी गोलंदाजी कशी असावी, याचा उत्तम वस्तुपाठ हा बेदी यांनी दाखवून दिला होता. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा दबदबा होता.
भारताच्या पहिल्या वनडे विजयात त्याचा मोलाचा वाटा होता. 1975 च्या विश्वचषक सामन्यात त्याच्या (12-8-6-1) गोलंदाजीने पूर्व आफ्रिकेला 120 धावांवर रोखले.
प्रख्यात क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“प्रख्यात क्रिकेटपटू बिशनसिंग बेदीजी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्याची खेळाबद्दलची आवड अतुट होती आणि त्यांच्या अनुकरणीय गोलंदाजीच्या कामगिरीमुळे भारताने अनेक संस्मरणीय विजय मिळवले. ते सदैव भविष्यातील क्रिकेटपटूंना प्रेरणा देत राहील. त्यांच्या कुटुंबीयासोबत आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना. ओम शांती.”
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बेदी यांच्या निधना नंतर म्हटले आहे की, ” भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी राहिले नाहीत. हे क्रिकेटचे मोठे नुकसान आहे,” बेदी, बीएस चंद्रशेखर, एस. वेंकटराघवन आणि एरापल्ली प्रसन्ना हे भारताच्या फिरकी गोलंदाजीच्या इतिहासातील क्रांतीचे अभियंते मानले जातात. त्यामधील बेदी यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूने आज जगाचा निरोप घेतला आहे.
बिशन सिंग बेदी यांच्या निधनानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्वीटरवर भावना व्यक्त केल्या आहेत.
जय शाह यांनी बिशन सिंग बेदी यांना श्रद्धांजली वाहिली असून ते म्हणाले की, “बिशनसिंग बेदी यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख खूप झाले. भारतीय क्रिकेटने आज एक आयकॉन गमावला आहे. बेदी सरांनी खऱ्या अर्थाने एका नव्या क्रिकेटच्या युगाची व्याख्या लिहिली आहे. एक जादुई फिरकी गोलंदाज म्हणून आपल्या कौशल्याने त्यांनी अमिट छाप सोडली. या कठीण काळातून सावरण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि प्रियजनांना बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझ्या संवेदना त्यांच्या परिवाराबरोबर आहेत.”
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांचे निधन”