Online Admission Process for GCC TBC Computer Typing Exam Starts
जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षा एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. यासाठी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त संस्थांमधून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांनी नियमबाह्य कामे केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी www.mscepune.in/CT_INST_MUMBAI.aspx या लिंकवर आपल्या जवळच्या मान्यता प्राप्त टायपिंग संस्थांची यादी तपासून पाहावी. त्यानंतर त्या संस्थेला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या प्रमाणपत्रावरील त्याच संस्थेचे नाव व पत्ता बरोबर असल्याची खातरजमा करूनच प्रवेश घ्यावा, असे आवाहन परिषदेमार्फत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यात वर्षातून दोन वेळा जीसीसी टीबीसी संगणकीय टायपिंग परीक्षा घेतल्या जातात. प्रत्येक विषयासाठी सहा महिन्यांचा अभ्यासक्रम असून याची प्रती विषय ६,५०० रुपये इतके शुल्क आकारले जाते. त्याचबरोबर लघुलेखन परीक्षा देखील घेतल्या जातात. त्यासाठी देखील प्रवेश सुरू झाले असल्याची माहिती परिषदेमार्फत देण्यात आली आहे.
संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतानाच परीक्षेचा प्राथमिक अर्ज ऑनलाईन भरून घेतला जाणार आहे. यामुळे ऐनवेळी परीक्षा अर्ज भरून घेणे किंवा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणे या गैरप्रकारांना आळा बसेल, असेही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू”