Former Union Minister of State Babanrao Dhakne passed away
माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन
बबनराव ढाकणे यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अहमदनगर : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचं काल रात्री निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. न्यूमोनिया झाल्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर अहमदनगर इथल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचं निधन झालं.
त्यांच्या पश्चात मुलगा प्रतापराव ढाकणे, सून, नातवंडे असा परिवार आहे. बबनराव ढाकणे यांच्या निधनामुळे राज्यातील एक संघर्षशील नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
बबनराव ढाकणे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९३७ मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. बबनराव ढाकणे हे सामान्य शेतकरी कुटुंबातले… पाथर्डीतील पागोरी पिंपळगावमधील सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.त्यांच्या घरात राजकीय वारसा नव्हता. पाथर्डीतील हिंद वसतिगृहात राहून त्यांनी शिक्षण घेतलं.
संघर्ष योद्धा नावाने ओळखले जाणारे ढाकणे यांनी पंचायत समितीपासून ते जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा राजकीय प्रवास केला.
महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे ते लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही भाग घेतला होता. बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते. बबनराव ढाकणे हे विद्यार्थीदशेपासूनच समाजकारणात सक्रिय होते. त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहातही सहभाग घेतला होता. 1958 साली यशवंतराव चव्हाण हे भगवानगडावर आले होते. तेव्हा बाशासाहेब भारदे आणि निऱ्हाळी यांची यांनी त्यांचा परिचय करून दिला अन् बबनराव ढाकणे काँग्रेसमध्ये सक्रीय झाले.
बबनराव ढाकणे यांच्या विनंतीनुसार महाराष्ट्रातील दुष्काळा दौरा करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाथर्डी तालुक्यात भेट दिली होती. त्यामुळे १९७२ ते ७५ दरम्यान पाथर्डी तालुक्यात ११० पाझर तलावांची निर्मिती झाली.
अवघे नववीपर्यंत शिक्षण झालेल्या बबनराव ढाकणे यांनी अनेक चळवळी आंदोलने केली व त्यासाठी कारावास भोगला. ऊस तोडणी मजुरांच्या प्रश्नावर त्यांचा तत्कालीन भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी संघर्ष झाला होता. काँग्रेस, जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास त्यांनी केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्थेची ही स्थापना केली.
बबनराव ढाकणे चार वेळेस आमदार आणि खासदार म्हणून ते लोकसभेवर निवडूनही गेले होते. राज्यात त्यांनी सार्वजनिक बांधकाम, ग्राम विकास खात्याचं मंत्रीपद भूषवलं होतं.
गेल्यावर्षीच त्यांच्या जीवन कार्यावरील ‘महाराष्ट्र विधान मंडळातील बबनराव ढाकणे’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या कार्यक्रमाला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी बबनराव ढाकणे यांनी केलेले भावनिक भाषणही चांगलेच गाजले होते.
उद्या दुपारी दोन वाजता पागोरी पिंपळगाव इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ढाकणे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. ढाकणे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
बबनराव ढाकणे यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
सर्वसामान्यांसाठी जनकैवारी म्हणून परिचित असणारे, लोकहिताकरिता संघर्षासाठी सदैव सज्ज असणारे नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, “विद्यार्थी चळवळीतून आपल्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीस सुरुवात करीत त्यांनी राज्याच्या व देशाच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. गोवा मुक्तीसंग्रामातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. एक संघर्षशील आणि आक्रमक राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख होती. ऊसतोडणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी कामगारांचे प्रश्न हिरीरीने मांडले. बाजार समितीच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला प्रारंभ करून थेट केंद्रीय मंत्री पदापर्यंत मजल मारली”.
“जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर, विशेषतः दुष्काळावरील उपाययोजनांसाठी त्यांनी केलेला संघर्ष हा राजकारण आणि समाजकारणात येणाऱ्या पुढील पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक राहील. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्वास मुकलो आहोत. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो तसेच त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना”, या भावनांसह मुख्यमंत्र्यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाने सर्वसामान्यांसाठी लढणारा संघर्षयोद्धा हरपला -उपमुख्यमंत्री अजित पवार
“माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे हे समाजातील गरीब, वंचित, दुर्बल घटकांच्या विकासासाठी लढणारे नेतृत्व होते. ऊसतोड कामगारांसाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला. विद्यार्थी चळवळीतून समाजकारणात सक्रिय असलेल्या बबनराव ढाकणे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची चिंता केली. बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधान परिषदेचे सदस्य, लोकसभेत खासदार, राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना प्रत्येक पदाला न्याय दिला. बबनराव ढाकणे हे लढाऊ नेतृत्व होत. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचे जीवन हे राजकीय, सामाजिक जीवनात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनाने संघर्षयोद्धा हरपला आहे. सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. बबनराव ढाकणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बबनराव ढाकणे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन आदरांजली वाहिली आहे.
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या रुपाने मार्गदर्शक नेतृत्व काळाच्या पडद्याआड – धनंजय मुंडे
बीड जिल्ह्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून त्यांच्या रुपाने मार्गदर्शक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
बबनराव ढाकणे यांनी बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून नेतृत्व केले होते. त्याचबरोबर केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. राज्यात सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास या खात्यांचे मंत्री, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते व उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम केले. ऊसतोड कामगार, शेतकरी-कष्टकऱ्यांचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. गोवा मुक्तीच्या चळवळीतही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले होते.
दि. 28 ऑक्टोबर रोजी बबनराव ढाकणे यांच्या पार्थिवावर मूळगाव पागोरी-पिंपळगाव, ता.पाथर्डी, जि.अहनदनगर येथे अंत्यसंस्कार केले जातील. ऊसतोड कामगार, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या प्रश्नांवर ते कायम आग्रही असायचे. त्यांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असेही मंत्री श्री.मुंडे यांनी म्हटले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com