Good work in Pune city in creating awareness about cleanliness
स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याबाबत पुणे शहरात चांगले कार्य – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
शासकीय निधी व लोकसहभागातून गृहनिर्माण संस्थांतील सुविधा निर्मितीसाठी प्रयत्न करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातल्या उत्तम कार्यपद्धती राबविण्यात पुणे शहराचा समावेश होईल असे काम इथे झाले आहे. शहर स्वच्छता आदींच्या अनुषंगाने गुणवत्ता जाणीव तळागाळात निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून शहरात पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महासंघ आणि नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी संस्थेमार्फत चांगले काम होत आहे, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
सहकार विभाग, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण आणि अपार्टमेंट महासंघ, नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी (एनएससीसी) आणि पुणे महानगरपलिका यांच्यावतीने आयोजित ‘हाऊसिंग सोसायटी अँड क्वालिटी सिटी’ परिषदेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार आयुक्त अनिल कवडे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन संदीप कदम, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, एनएससीसीच्या अध्यक्षा शामला देसाई, सचिव मैथिली मनतवार आदी उपस्थित होते.
पुणे शहरात अनेक वर्षापासून नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी (एनएससीसी) तसेच गृहनिर्माण महासंघाचे चांगले काम झाले आहे, असे सांगून उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, शहरातील टेकड्या वाचविण्याचे काम संस्थेने केले आहे. प्रत्येक बाबतीत शहर स्वच्छ असावे, पर्यावरण, प्रशासन स्वच्छ असावे, सुप्रशासन असावे या भूमिकेतून संस्थेचे काम होत असून विविध उपक्रमात नागरिकांचा सहभाग घेतला आहे.
शहरातील वाड्यांचा, जुन्या इमारतींचा पुनर्विकास असे प्रश्न आहेत. शहरात गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट यांचे सुनियोजन करण्यासाठी संस्था करत असलेले काम महत्वाचे आहे. राज्यातील मुंबई प्रमाणेच अन्य मोठ्या शहरात अशा परिषदा आणि प्रदर्शनाचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुणे शहरात सर्वाधिक दुचाकी वापर असताना तसेच संगणकीय क्षेत्रात बेंगळुरूशी स्पर्धा करत असताना या बाबतच्या पायाभूत सुविधा, वाय-फाय यंत्रणा, इंटरनेट जोडणी व्यवस्थित मिळावी अशी या उद्योगातील मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले.
नदीकिनारा विकास, घनकचरा व्यवस्थापन, रिकाम्या जागांचे संरक्षण, हरित विकास आराखडा, जैव विविधता पार्क असे विविध विषय असून टेकडी संरक्षणात अनेक लोक काम करत असताना मूळ मालकांना त्याचा मोबदला मिळावा. वन विभागाने अतिशय चांगल्या प्रकारे भांबुर्डा वन विहाराचे निर्माण केले आहे, असे चांगले प्रयत्न व्हावेत. ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या ज्येष्ठ नागरिक सेवा तक्रार प्राधिकरणाचा प्रचार व्हावा. वाहतुकीची व्यवस्था, पुरवठादार धोरण, मतदार नोंदणी, निवडणुकीत लोकांचा सहभाग वाढविणे आदी सर्व बाबतीत महासंघाला सहकार्य करण्यात येईल, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
शासकीय निधी व लोकसहभागातून गृहनिर्माण संस्थांतील सुविधा निर्मितीसाठी प्रयत्न करू – चंद्रकांत पाटील
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, २०१४ ते १९ या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना शासनाची एकही इमारत यापुढे रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा निर्मिती करणारी नसेल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्यास त्यांना अर्थसंकल्पात निधी मिळणार नाही असा निर्णय घेण्यात आला. पुणे महानगर पालिकेनेही यापुढे नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना मान्यता ती ग्रीन अपार्टमेंट, सोसायटी नसेल तर परवानगी मिळणार नाही असा निर्णय घेतला आहे. गुणवत्तापूर्ण शहर निर्मितीच्यादृष्टीने याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अगोदर झालेल्या सोसायट्यातही त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक निधी शासकीय तसेच लोकसहभागातून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
कोथरूडच्या ५०० सोसायट्यांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग व ते नष्ट करणाऱ्या मशीन बसवण्यासाठी प्रयत्न असून आतापर्यंत १० सोसायट्यात ते बसवले आहेत. सोसायटीनिहाय अशा बारीक सारीक बाबींचा विचार झाला पाहिजे. असे उपक्रम शासकीय, जिल्हा वार्षिक योजना अथवा नगरविकासच्या योजनेत बसवता येईल का यासाठी प्रयत्न सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच सांडपाणी प्रक्रिया करून त्याचा बागा, गाडी धुण्यासाठी उपयोग असे करण्याचा विचार करावा, असे आवाहन श्री.पाटील यांनी केले.
सौर पॅनेल, उत्तम जिमनॅशियम, इनडोअर खेळांचे कोर्ट, सुक्या व ओल्या कचऱ्याची निर्गती होते, सांडपाण्याचे पुनर्प्रक्रिया होऊन वापर होतो अशी एक सोसायटी महासंघाने निवडावी. या सोसायटीला लागणाऱ्या सर्व बाबी सोसायटीचा निधी तसेच अन्य निधी मिळवून पूर्ण करू असे, असे त्यांनी सांगितले.
पुणे शहरात १७ हजार सोसायट्या व पूर्ण महाराष्ट्रात १ लाख गृहनिर्माण संस्था व १ लाख अपार्टमेंट असल्याने त्यांना कोणतेही अभियान दिल्यास वेगाने ते राबविले जाऊ शकते, असेही मंत्री श्री. पाटील म्हणाले.
प्रास्ताविकात शामला देसाई म्हणाल्या, ५० वर्षापूर्वी शंतनुराव किर्लोस्कर यांनी शहर स्वच्छ, सुंदर असावे या भूमिकेतून विविध संस्था, प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून काम व्हावे यासाठी एनएससीसी संस्थेची स्थापना केली. शहर सौंदर्यीकरण, कचरा व्यवस्थापन आदींमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुहास पटवर्धन यांनी महासंघाच्या कार्याची माहिती दिली. महासंघ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना या परिषदेचे व प्रदर्शनाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. महासंघाने सोसायट्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ग्रिव्हन्स पोर्टल सुरू केले आहे. संस्थांना विविध सेवा घरबसल्या मिळाव्यात यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.
प्रारंभी उपसभापती डॉ. गोऱ्हे आणि मंत्री श्री. पाटील यांनी प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली. या प्रदर्शनात गृहनिर्माण संस्थांना उपयुक्त विविध सेवा पुरवठादार, उपयुक्त साधने, संरक्षण उपकरणे, बँका आदींचे स्टॉल समाविष्ट आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याबाबत पुणे शहरात चांगले कार्य”