Organizing various programs on the occasion of All India Cooperative Week
अखिल भारतीय सहकारी सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाने निश्चित केलेल्या विषयानुसार सहकार सप्ताहाचे सात दिवस साजरे करण्यात येणार
पुणे : भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार ७० वा अखिल भारतीय सहकारी सप्ताह १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सहकारी संस्था, सहकारी संस्थांचा महासंघ यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि सहकार विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे.
भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्यावतीने दरवर्षी संपूर्ण देशात अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचे आयोजन केले जाते. या वर्षाच्या सहकार सप्ताहाची मुख्य संकल्पना ‘भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची करणे आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात सहकारी यंत्रणेची भूमिका’ ही आहे. भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाने निश्चित केलेल्या विषयानुसार सहकार सप्ताहाचे सात दिवस साजरे करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमांतर्गत १४ नोव्हेंबर रोजी ‘वर्तमान काळात सहकारामध्ये दिसून येत असलेले विकासात्मक बदल, १५ नोव्हेंबर ‘सहकारी बिगर पतसंस्थांचा पुनरुद्धार आणि वित्तीय समावेशीकरण करणे’, १६ नोव्हेंबर ‘सहकारी संस्थांनी आपले डिजिटलायझेशन करून घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा स्वीकार व अद्ययावतीकरण करणे’ या विषयावर आधारीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
१७ नोव्हेंबर रोजी ‘सहकारी संस्थांसाठी उपलब्ध असलेली उदयोन्मुख क्षेत्रे व त्यांनी व्यवसाय करण्यासाठी सुलभीकरण करणे’, १८ नोव्हेंबर ‘सरकारी, खाजगी व सहकारी संस्था यांच्यातील भागीदारी बळकट करणे’, १९ नोव्हेंबर ‘महिला, युवक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सहकारी संस्थांची स्थापना करणे’, २० नोव्हेंबर ‘सहकारी शिक्षण व प्रशिक्षणाचा पुनरुद्धार करणे’ या विषयावर कार्यक्रमांच्या माध्यमातून चर्चा होईल.
सहकारी संस्थांच्या सहकार्याने व संघाच्या घटक कार्यालयांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सहकारी संस्थांचा महासंघ, नागरी सहकारी बँक यांच्या सहकार्याने कार्यक्रमांचे आयोजन करून सहकार सप्ताह साजरा करावा, असे आवाहन सहनिबंधक सहकारी संस्था तथा महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “अखिल भारतीय सहकारी सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन”