300 schools and colleges in Mumbai will have career guidance meet
मुंबईतील ३०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन मेळावा
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार उद्या शुभारंभ
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील ३०० शाळा, महाविद्यालयांमधील ६० हजार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना करिअर मार्गदर्शनपर मेळावा पहिल्या टप्प्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग,शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालनालय आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचा शुभारंभ कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते दिनांक ५ डिसेंबर (मंगळवार) रोजी सकाळी १० वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.
शालेय शिक्षण घेत असताना करिअरच्या वेगवेगळ्या संधी कोणत्या आहेत याबाबत विद्यार्थी आणि पालकांना माहिती व्हावी, यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग एकत्र येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन मळावा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
करिअर मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये करिअर कसे निवडावे, करिअरच्या विविध वाटा, व्यक्तिमत्व विकास, कृत्रिम बुध्दीमत्तेच्या सहाय्याने अभ्यास कसा करावा याबाबत विद्यार्थी व पालकांना तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाईल. यावेळी विविध अभ्यासक्रमांची माहिती असलेली करिअर प्रदर्शनी विद्यार्थी आणि पालकांना पाहण्यास उपलब्ध असेल. विविध करिअर क्षेत्रे, विविध अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती योजना याबाबत अद्यायावत माहिती असलेले करिअर प्लॅनर हे पुस्तक विद्यार्थी व पालकांना विनामूल्य देण्यात येईल. या कार्यक्रमामध्ये करिअर मार्गदर्शक आनंद मापुस्कर, प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्राचार्य मनिषा पवार यांचे पथक करिअर मार्गदर्शन करणार आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “मुंबईतील ३०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन मेळावा”