Deliver government schemes to the beneficiaries through the Vikashit Bharat Sankalp Yatra
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यत पोहोचवा – राज्यपाल रमेश बैस
नागपूर : केंद्र शासनाने सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी योजना सुरु केल्या आहेत. त्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन आज राज्यपाल रमेश बैस यांनी भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथील डिफेन्स अकॅडमी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार परिणय फुके, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पोलीस अधीक्षक लोहीत मतानी उपस्थित होते.
राज्यपाल आणि पालकमंत्री यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रचार वाहनाला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.
केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसीत भारत संकल्प यात्रा महत्वाची ठरणार असून, याद्वारे चिन्हीत करण्यात आलेल्या 17 योजनांचा प्रचार-प्रसार करून त्या तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून आयुष्मान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पंतप्रधान विश्वकर्मा, पंतप्रधान किसान सन्मान, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल-जल जीवन मिशन, जनधन योजना, अटल पेन्शन योजना, नॅनो फर्टिलायझर्स इत्यादी योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी लागेल. यासाठी लोकसहभागही महत्वाचा असल्याचे राज्यपालांनी अधोरेखित केले.
विकसित भारत यात्रेचा मूळ उद्देश शासनाच्या योजनांच्या प्रसारासोबतच लाभार्थ्यांना वेळेत लाभ देणे आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 111 गावात ही यात्रा पोहोचली असून, 7 हजारांवर नागरिकांनी सहभाग घेतला असल्याचे पालकमंत्री डॉ.गावीत यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या नेतृत्वात विकसित भारत संकल्प यात्रेतून देश विकासमार्गावर अग्रेसर होणार असल्याचा विश्वास खासदार श्री. मेंढे यांनी व्यक्त केला. यासोबतच केंद्र शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्ह्यात सुरु असलेल्या प्रगतीविषयी माहिती त्यांनी दिली. श्री. भोंडेकर यांनी जिल्ह्यातील विकासकामांची माहिती दिली.
राज्यपालांच्या हस्ते विविध योजनांचे 22 लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात आले. तुमसर येथील पवन कटनकर व लाखनी उमेद महिला बचतगटाच्या उषा कावळे या लाभार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. राज्यपालांनी विकसित भारत संकल्प उपक्रमांतर्गंत सहभागी शासकीय विभागांच्या स्टॉल्सना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
श्री. कुर्तकोटी यांनी आभार मानले. या कार्यक्रमानंतर राज्यपालांनी कोरंबी येथील पिंगळेश्वरी मातेच्या मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यत पोहोचवा”