The government is trying to ensure that the employment of Ganesha sculptors will not be affected
गणेश मूर्तिकारांच्या रोजगारावर परिणाम होणार नाही, यासाठी शासन प्रयत्नशील- दीपक केसरकर
राज्यातील प्रदूषण टाळण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत आवश्यक त्या उपाययोजना व मार्गदर्शक सूचना निर्गमित
नागपूर : पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची निर्मिती करताना मूर्तिकार, कलाकार यांच्या रोजगारावर परिणाम होणार नाही, यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद सदस्य जयंत पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी सर्वश्री प्रवीण दरेकर, अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला.
शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जात असून पाण्यावर प्रक्रिया करून देण्यात येत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती तयार करणे, विक्री करणे यास प्रतिबंध आहे. पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना प्रोत्साहन देत असताना या व्यवसायातील कामगारांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांचे व्यवसाय निसर्गाला पूरक होतील, यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले, राज्यातील प्रदूषण टाळण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत आवश्यक त्या उपाययोजना व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. पर्यावरणविषयक विविध कायदे व त्या कायद्यांची अंमलबजावणी व्यापक जनहितार्थ असून त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महानगरपालिका हद्दीतील घरगुती गणपती पर्यावरणपूरक असतील व याबाबत योग्य ती अंमलबजावणी करण्यात यावी, यासंदर्भात सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “गणेश मूर्तिकारांच्या रोजगारावर परिणाम होणार नाही”