बाल विज्ञान प्रदर्शनाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल

Governor Ramesh Bais राज्यपाल रमेश बैस हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

A scientific approach will reach every home through Children’s Science Exhibition

बाल विज्ञान प्रदर्शनाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल-राज्यपाल रमेश बैस

५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन

Governor Ramesh Bais राज्यपाल रमेश बैस हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News
File Photo

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. विविध संस्था आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे हे केवळ विज्ञान प्रदर्शन न राहता विज्ञानाचा उत्सव झाला आहे. या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी भेट देणार असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे हे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल,असा विश्वास राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, एनसीईआरटीचे सहसंचालक डॉ. श्रीधर श्रीवास्तव, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.बैस म्हणाले की, नियमित शिक्षण घेताना विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाद्वारे विद्यार्थी आणि बाल वैज्ञानिकांच्या सृजनशीलतेला चालना मिळते. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी शाळांमधून अशा प्रदर्शनाचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. प्रत्येक व्यक्तीत असा गुण असतो आणि इच्छाशक्तीच्या माध्यमातून तो समोर येतो. बाल वैज्ञानिकांच्या या प्रदर्शनातूनही अशाचप्रकारे भविष्यातील वैज्ञानिक तयार होतील, त्यांच्या वैज्ञानिक अविष्कारातून नवे पेटंटची नोंद केली जाईल आणि हेच बाल वैज्ञानिक राष्ट्राच्या वैज्ञानिक प्रगतीत हातभार लावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे बाल विज्ञान प्रदर्शन ‘तंत्रज्ञान आणि खेळणी’ या विषयावर आधारित आहे. भारतात स्थानिक खेळण्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ही खेळणी विज्ञान विषयावर आधारित असल्यास मनोरंजनातून विज्ञानाविषयी आकर्षण निर्माण होईल. शाळांमधूनही अशा प्रदर्शनाचे आयोजन झाल्यास विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता वाढीस लागेल. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीचे प्रयत्न न थांबविता संशोधनाचे प्रयत्न सुरू ठेवावे, असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी केले.

पुणे हे संस्कृती आणि शिक्षणाचे केंद्र असल्याचे नमूद करतांना डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी वैज्ञानिक क्षेत्रात राज्याचे नाव जगभरात पोहोचविले, असे गौरवोद्गार राज्यपाल श्री. बैस यांनी काढले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले की, मुंबई येथे १९७९ आणि २००६ मध्ये पुण्याला हे प्रदर्शन भरविण्याची संधी मिळाली होती. अलीकडच्या काळात आर्थिक प्रगतीसाठी नाविन्यता आणि नवकल्पनांना महत्व प्राप्त झाल्याने अशा प्रदर्शनाचे महत्व वाढले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षणातही विद्यार्थ्यांची शोधकवृत्ती वाढीस लागेल यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रदर्शनातील वैज्ञानिक आविष्कार अत्यंत उपयुक्त आहेत, असे त्यांनी सांगितले. एक ट्रस्ट तयार करून अशा प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीला बाजारात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणानुसार हे प्रदर्शन महत्त्वाचे आहे. नव्या युगातील गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात आपल्याला लक्ष द्यावे लागेल. शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी चांगले तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसमोर ठेवावे लागेल. या प्रदर्शनातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक अविष्कारातून शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यातून जगाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान राज्यात राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

एनसीईआरटीचे सहसंचालक श्रीवास्तव म्हणाले, गेल्या पाच दशकापासून विविध राज्यात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एनसीईआरटी प्रयत्न करते. विद्यार्थ्यांमधील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल. ‘तंत्रज्ञान आणि खेळणी’ या विषयावरील नवकल्पना प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.येडगे यांनी प्रास्ताविकात बाल विज्ञान प्रदर्शनाविषयी माहिती दिली. यावर्षी १७३ बाल वैज्ञानिकांनी आपल्या प्रतिकृतीसह या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. दररोज १० हजार विद्यार्थी, शिक्षक, पालक प्रदर्शनाला भेट देतील. या कालावधीत राज्यभरातील शाळांमध्ये विज्ञान पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमापूर्वी राज्यपाल श्री. बैस यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या निर्मिती आणि शोधकवृत्तीला दाद दिली.

बाल वैज्ञानिक प्रदर्शन २०२३

राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. संपूर्ण देशातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, विविध भागधारक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती या प्रदर्शनास भेट देणार आहेत. प्रदर्शनाकरीता ३१ राज्यातील  विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला आहे. या व्यतिरिक्त नवीन शैक्षणिक विचार प्रवाह, यशोगाथा व यशस्वी उपक्रम यासाठी राज्यातून निवडक २५ दालनाद्वारे विविध शासकीय व स्वयंसेवी संस्था यांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. हे प्रदर्शन ३० डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे.

प्रदर्शनाचा मुख्य विषय  ‘तंत्रज्ञान आणि खेळणी’ असा निश्चित केला आहे. सामाजिक,पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून  माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती, पर्यावरणास अनुकूल सामग्री, आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि नवोपक्रम,पर्यावरणीय चिंता,  वर्तमान नवोपक्रमासह ऐतिहासिक विकास आणि आमच्यासाठी गणित असे सात उपविषय निर्धारित करण्यात आले आहेत.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आढावा
Spread the love

One Comment on “बाल विज्ञान प्रदर्शनाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *