सर्वंकष स्वच्छता मोहीम लोकचळवळ व्हावी

Eknath Shinde एकनाथ शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Cleanliness campaigns should be a public movement

सर्वंकष स्वच्छता मोहीम लोकचळवळ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दर शनिवारी एक याप्रमाणे 24 फेब्रुवारी 2024 पर्यत प्रत्येक प्रभाग समितीत हे अभियान राबविले जाणार

ठाणे : सर्वंकष स्वच्छता मोहीम (Deep Clean Drive) लोकचळवळ व्हावी, ही मोहीम मुंबई, मुंबई महानगर, एमएमआर क्षेत्र अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर राबविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ‍

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहिमेची सुरूवात काल वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातून करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या मोहिमेत मुख्यमंत्री स्वतः सहभागी झाले होते.

Eknath Shinde एकनाथ शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ठाण्यातील प्रदूषण तुलनेने कमी असून ते आणखी कमी करण्यासाठी जिथे जिथे जागा मिळेल तेथे झाडे लावून हरीत पट्टे तयार करावेत, जेणेकरुन ऑक्सिजन पार्क तयार होतील. तसेच मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करुन शहरात जंगले (Urban forest) तयार करावीत. त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. जिथे स्वच्छता असते, तिथे लोक कचरा टाकत नाहीत. आज बीएमसी पाईपलाईन येथे साठलेला कचरा साफ केला जातो आहे, त्याठिकाणी ग्रीन पॅच तयार करुन तो परिसर हिरवागार करा, जेणेकरुन त्याचे दृश्य स्वरुप नागरिकांना दिसेल.

ठाण्यातील वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना होऊ नये, यासाठी वाहतुकीचे ‍नियोजन करावे, त्याचप्रमाणे फेरीवाल्यांना हॉकर्स झोनमध्ये जागा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

स्वच्छता अभियानाचे ठाणे महानगरपालिकेने केलेले नियोजन हे उत्कृष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विशेषतत्वाने नमूद केले. त्यांनी यावेळी जयेश गायकवाड व अनिता शिरसाट या सफाई कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान केला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तीन हात नाक्यावरुन मॉडेला नाका मार्गे वागळे मुख्य रस्ता, 16 नं. येथील बीएमसी पाईपलाईनवरील पूल, रोड नं. 21, रोड नं 22 येथील शिवसेना शाखा येथून चालत सर्व ठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वत:ही काही ठिकाणी रस्त्यांची सफाई केली तसेच फूटपाथवर पाण्याची फवारणी करुन फूटपाथ स्वच्छ केले.

या अभियानात सहभागी झालेल्या भजनी मंडळ, स्वच्छता स्वयंसेवक, ज्येष्ठ नागरिक संघ, एनसीसी, एनएसएस, शालेय विद्यार्थी तसेच विविध धार्मिक संस्थामार्फत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांशी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संवाद साधला.

सर्वंकष स्वच्छता अभियानाच्या नियोजनाबाबत ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, आज वागळे इस्टेट प्रभागापासून या मोहिमेचा प्रारंभ झाला असून दर शनिवारी एक याप्रमाणे 24 फेब्रुवारी 2024 पर्यत प्रत्येक प्रभाग समितीत हे अभियान राबविले जाणार आहे.

या अभियानात मार्केट, गल्ल्या, बसस्थानके, फूटपाथ, दुभाजक, नाले, मैदाने, कचरा जमा होणारी ठिकाणे, विसर्जन घाट अशा सर्व सार्वजनिक ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानात एकूण 2 हजार 500 महापालिकेचे कर्मचारी, 1 हजार 797 स्वच्छता कर्मचारी, विविध संस्थाचे स्वयंसेवक असे 5 हजारांहून जास्त मनुष्यबळ या अभियानात सहभागी झाले असून त्यांच्यामार्फत सफाई केली जात आहे. सफाईसाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्री, पाण्याचे टँकर, प्रथमोपचाराची साधने, ऍम्ब्युलन्स अशा सेवा त्यांना पुरविण्यात आल्या आहेत.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
ग्रामीण नागरिकांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचे केंद्र शासनाचे काम
Spread the love

One Comment on “सर्वंकष स्वच्छता मोहीम लोकचळवळ व्हावी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *