First military school for girls inaugurated at Vrindavan
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उत्तर प्रदेशात वृंदावन येथे मुलींच्या पहिल्या सैनिकी शाळेचे उद्घाटन
सशस्त्र दलांमध्ये दाखल होऊन मातृभूमीचे संरक्षण करू इच्छिणाऱ्या मुलींसाठी ही शाळा म्हणजे आशेचा किरण असल्याचे केले प्रतिपादन
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल , 01 जानेवारी 2024 रोजी उत्तर प्रदेशात वृंदावन येथे मुलींच्या पहिल्या सैनिकी शाळेचे उद्घाटन केले. देशातील सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये बिगर सरकारी संस्था, खासगी संस्था/राज्य सरकारी शाळा यांच्याशी भागीदारी करून देशभरात 100 नव्या सैनिकी शिक्षण शाळा स्थापन करण्याच्या केंद्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत,42 शाळा स्थापन करण्यात आल्या असून, आज 870 विद्यार्थी क्षमता असलेली ही केवळ मुलींसाठीची पहिली सैनिकी शाळा सुरु करण्यात आली आहे. पूर्वापारपासून देशात सुरु असलेल्या 33 सैनिकी शाळांच्या व्यतिरिक्त या 100 शाळा स्थापन होणार आहेत.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना संरक्षणमंत्री म्हणाले की सशस्त्र दलांमध्ये दाखल होऊन मातृभूमीचे संरक्षण करण्याची इच्छा असणाऱ्या मुलींसाठी ही संविद गुरुकुलम मुलींसाठीची सैनिकी शाळा म्हणजे आशेचा किरण ठरेल. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली सरकारने महिलांना सशस्त्र दलांमध्ये त्यांच्या हक्काचे स्थान मिळवून दिले आहे जे गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहून गेले होते. महिलांना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांप्रमाणेच देशाचे रक्षण करण्याचा हक्क आहे.आम्ही मुलींना सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी दिलेली मंजुरी हा महिला सशक्तीकरणाच्या इतिहासातील एक सोनेरी क्षण होता. आजघडीला आपल्या, देशातील महिला केवळ लढाऊ विमाने चालवत नाहीत तर आपल्या सीमांचे संरक्षण देखील करत आहेत,” ते म्हणाले.
वर्ष 2019 मध्ये संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मुलींना शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून टप्प्याटप्प्याने सैनिकी शाळेत प्रवेश देण्यास मंजुरी दिली होती याचे स्मरण करणे सयुक्तिक ठरेल. मिझोरम मधील छिंगछिप येथे संरक्षण मंत्रालयाने प्रायोगिक तत्वावर स्थापन केलेल्या शाळेच्या प्रायोगिक प्रकल्पाला मिळालेल्या यशानंतर हा निर्णय घेण्यात आला.
देशातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे तसेच या विद्यार्थ्यांना सशस्त्र दलांमध्ये दाखल होण्यासह कारकीर्द घडवण्याच्या अधिक उत्तम संधी उपलब्ध करून देणे हे देशभरात 100 नवीन सैनिकी शाळा उभारण्याच्या कल्पनेमागील उद्देश आहे. आजच्या युवकांना उद्याचे जबाबदार नागरिक होण्यासाठी चांगल्या पद्धतीने घडवून देश उभारणीच्या कार्यात सरकारच्या खांद्याला खांदा भिडवून काम करण्याची संधी देखील या उपक्रमामुळे खासगी क्षेत्राला प्राप्त झाली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्य सरकारमधील अनेक वरिष्ठ अधिकारी देखील वृंदावन येथील संविद गुरुकुलम मुलींच्या सैनिकी शाळेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “वृंदावन येथे मुलींच्या पहिल्या सैनिकी शाळेचे उद्घाटन”