Distribution of useful tools to disabled beneficiaries
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना उपयुक्त साधनांचे वितरण
मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचा उपक्रम
मुंबई : दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त अशा विविध साधनांचे व उपकरण संचांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वर्षा शासकीय निवासस्थानी दिव्यांग लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात २६ दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरी संचलित तीनचाकी सायकल, वैद्यकीय उपकरणांचा संच (कम्युनिटी मेडिकल किट) अशा साहित्याचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्रातील सामाजिक उत्तरदायित्व निधीतील (सीएसआर) कामांचे लोकाभिमुख नियोजन व्हावे म्हणून मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्यातील या क्षेत्रातील काम अधिक वेगवान पद्धतीने जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नेण्यासाठी हा कक्ष प्रयत्नशील आहे. त्या अंतर्गत आज या साधनांचे, उपकरणांचे वितरण करण्यात आले. आज वितरित करण्यात आलेल्या या साधनांसाठी इन्व्हेंशिया फार्मा, अंजता फार्मा, इम्युक्यूअर फार्मा आणि सँडोझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी सहकार्य केले आहे. यात दिव्यांगाना केवळ प्रवासासाठी नाही तर रोजगार निर्मितीचे साधन म्हणून पर्यावरणपूरक अशा बॅटरी संचलित तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग बांधवांना वापरता येतील, अशा कम्युनिटी मेडिकल किटच्या वितरणासही प्रारंभ करण्यात आला.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ यांना दिव्यांग बांधवांसाठी वापरता येतील, अशा किटस् चा समावेश आहे. यात मोजक्या पण महत्त्वाच्या निवडक उपकरणे, वस्तूंच्या संचाचा समावेश आहे. हे किट उत्सव मंडळांना आणि निवासी संकुलांकडे सुपूर्द करण्यात येतील. ज्यामध्ये वॉकर, व्हिल चेअर, स्ट्रेचर, प्रथमोपचार पेटी, ग्लुकोमीटर, टेंम्परेचर गन, पल्स ऑक्सीमीटर, रक्तदाब मोजण्याचे उपकरण, नेब्युलायझर अशा बारा वस्तूंचा समावेश आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना उपयुक्त साधनांचे वितरण”