All should work together for the development of the theatre movement
नाट्य चळवळीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावे – उद्योगमंत्री उदय सामंत
कलावंत स्वत: एकटा मोठा होत नसतो तो विविध ठिकाणाहून चांगले गुण घेऊन संपन्न होत असतो
पुढच्या काळात मराठी रंगभूमी भारतीय रंगभूमीचे नेतृत्व करेल
पुणे : सांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून नाटकाकडे बघताना सर्वांनी नाट्य चळवळीच्या विकासासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष ज्येष्ठ कलाकारांमधून एकमताने ठरविला जावा, अशी अपेक्षाही श्री.सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.
गणेश कला क्रीडा संकुल येथे आयोजित १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. नाटकाच्या घंटेचे पूजन करून आणि संमेलनाध्यक्षांच्या हस्ते घंटा वाजवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुरेश खरे, दत्ता भगत, गंगाराम गवाणकर, नाट्यपरिषदेचे विश्वस्त शशी प्रभू, अशोक हांडे, मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी उपस्थित होते.
उद्योगमंत्री श्री.सामंत म्हणाले, अनेक देणगीदारदेखील नाट्य चवळवळीला प्रोत्साहन देत आहेत. शासनाकडून मिळणारा निधी नाट्य चवळवळ पुढे नेण्यासाठी पडद्यामागील कलावंतांच्या मदतीसाठी वापरला जावा असा प्रयत्न आहे. स्व. विक्रम गोखले यांचे स्वप्न साकार करण्यासाठी रत्नागिरीचे नाट्य संमेलन होण्यासाठी, वृद्ध कलाकारांसाठी वृद्धाश्रमाचे काम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
हिंदी आणि मराठी रंगभूमीत मोठी तफावत दिसून येते. मराठी माणसाने हिंदीतही पुढे जावे यासाठी त्याच्यामागे पाठबळ उभारण्याची गरज आहे. नाट्य निर्मात्यांनी आणि कलाकारांनी नाट्य संमलेनाचे तीन दिवस आपल्या मातृसंस्थेसाठी आहे हे लक्षात घ्यावे आणि प्रेक्षकांच्या इच्छेचाही विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्री. गज्वी म्हणाले, कलावंत स्वत: एकटा मोठा होत नसतो तो विविध ठिकाणाहून चांगले गुण घेऊन संपन्न होत असतो. जब्बार पटेल हे मराठी रंगभूमीवरचे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्या हातून चांगले कार्य घडेल. शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने पाच महिने रंगकर्मी कार्यरत राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढच्या काळात मराठी रंगभूमी भारतीय रंगभूमीचे नेतृत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रशांत दामले यावेळी म्हणाले, शासनाने मराठी नाट्यसृष्टीला पायाभूत सुविधा दिल्या असताना कलाकारांनी उत्तम कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करावा. नाट्यकलेसाठी सराव फार गरजेचा असून त्याकडे कलाकारांनी विशेष लक्ष देणे आणि नाट्य रसिकांनी पुढच्या पिढीला नाटकाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणे या तीन गोष्टी नाट्यसृष्टीसाठी महत्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले. सर्वांच्या सहकार्याने नाट्य संमेलन यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त् केला.
श्री.राजेभोसले यांनी प्रास्ताविकात १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाविषयी माहिती दिली. शासनाने ९ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी नाट्य संमेलनासाठी उपलब्ध करून दिला आहे. यातील काही निधी नाट्य कलावंताच्या कल्याणासाठी उपयोगात आणला जाईल. पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीतून २० लाखाचा निधी मंजूर केला, असे ते म्हणाले.
यावेळी प्रशांत दामले , ज्येष्ठ कलावंत सरुप कुमार, लीला गांधी, सुहासिनी देशपांडे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमापूर्वी प्रियांका बर्वे, राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांनी ‘नाट्यधारा’ हा नाट्यगीतांचा कार्यक्रम सादर केला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “नाट्य चळवळीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावे”