Governor Ramesh Bais appeal to the media to give priority to national interest
राष्ट्रीय हिताला प्राधान्य देण्याचे राज्यपाल रमेश बैस यांचे माध्यमांना आवाहन
ओडिशा आणि उत्तराखंड राज्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची घेतली सदिच्छा भेट
मुंबई : ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चा भाग म्हणून विविध राज्यांमधील माध्यम प्रतिनिधींसाठी महाराष्ट्र दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ओडिशा आणि उत्तराखंड राज्यांमधील पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. ११) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
दोन्ही राज्यातील दूरचित्रवाणी आणि मुद्रित माध्यमातील पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारिता करताना माध्यमांनी राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन राज्यपाल बैस यांनी यावेळी केले.
माध्यमांनी निव्वळ गुन्हेगारीविषयक बातम्यांवर प्रकाश टाकण्याऐवजी समाजातील सकारात्मक घडामोडी वाचकांपुढे आणून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आपण अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री म्हणून काम केले होते, असे सांगून राज्यपाल बैस यांनी इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांच्या क्रांतीनंतर देखील मुद्रित माध्यमाने आपली विश्वासार्हता व जागा टिकवून ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
विकसित भारत संकल्प यात्रेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र भेटीचे आयोजन केल्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी भारत सरकारचे आभार मानले. राज्य भेटीमुळे आपणांस महाराष्ट्राचा विकास, प्रगती आणि सांस्कृतिक वारसा पाहता आला, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र भेटीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे, आयएनएस शिवाजी आणि जवाहरलाल नेहरू बंदर आदी संस्थान पाहून प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले व राज्य भेटीचा उपक्रम सुरु राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
राज्यपालांच्या सूचनेनुसार, ओडिशा आणि उत्तराखंडमधील पत्रकारांनी राजभवनातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली.
भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने पत्रकारांच्या महाराष्ट्र भेटीचे आयोजन केले होते.
यावेळी प्रेस इन्फर्मेशन ब्युरोच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा, उपसंचालक जयदेवी पुजारी स्वामी, सहायक संचालक निकिता जोशी, माध्यम अधिकारी श्रीयंका चॅटर्जी उपस्थित होते.
शिष्टमंडळामध्ये देवेंद्र सती (दैनिक जागरण), गिरीश चंद्र तिवारी (दैनिक भास्कर), भूपेंद्र कंदारी (राष्ट्रीय सहारा), गिरीश पंत (बद्री विशाल), सुरेंद्र सिंग दशिला (झी न्यूज), अफजल अहमद राणा (दैनिक सहफत), ममता बोसोई (समाजा) , चौधरी अमिताव दास (समद). सुदीप कुमार राउत (प्रमेय), रंजन प्रधान (प्रगतिवादी), मृणाल कांती नंदा (कलिंग टीव्ही), देबनारायण महापात्रा (न्यूज 7), दिव्य ज्योती मोहंती (अर्गस न्यूज) आदी माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “राष्ट्रीय हिताला प्राधान्य देण्याचे राज्यपाल रमेश बैस यांचे माध्यमांना आवाहन”