Marathi language lovers should be included in the World Marathi Conference
विश्व मराठी संमेलनात मराठी भाषाप्रेमींना समाविष्ट करून घ्यावे – मंत्री दीपक केसरकर
मुंबई : ‘मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती’ अशी मध्यवर्ती संकल्पना ठरवून येत्या 27 ते 29 जानेवारी या कालावधीत विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात महाराष्ट्र आणि देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या भाषा प्रेमींना जास्तीत जास्त संख्येने समाविष्ट करून घ्यावे, अशी सूचना मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्र येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या पूर्वतयारीचा मंत्री श्री.केसरकर यांनी गुरूवारी आढावा घेतला. यावेळी उपसचिव हर्षवर्धन जाधव, अवर सचिव नितीन डंगारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.शामकांत देवरे, भाषा संचालक विजया डोनीकर, साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.केसरकर म्हणाले, महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही मराठी भाषा जपणारे नागरीक मोठ्या संख्येने आहेत. या सर्वांना एकत्र येऊन संवाद साधता यावा, त्यातून भाषेच्या संवर्धनासाठीची देवाण-घेवाण व्हावी, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उपक्रम राबविता यावेत या उद्देशाने विश्व मराठी संमेलन उपयोगी सिद्ध होणार आहे. यादृष्टीने बृहन्महाराष्ट्र मंडळे तसेच परदेशातील मराठी भाषेशी संबंधित संस्थांशी संपर्क साधण्यात यावा. महाराष्ट्रातील अधिकाधिक भाषा प्रेमी नागरिक संमेलनात सहभागी होतील यासाठी देखील प्रयत्न करण्यात यावेत.
या संमेलनात साहित्यिक, मराठी भाषेच्या योगदानासाठी विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती, मराठीपण जपणारे राजघराणे आदींसह विविध माध्यमांचे संपादक, विविध क्षेत्रांतील मराठी उद्योजक आदींनाही निमंत्रित करण्यात यावे, अशी सूचना देखील मंत्री श्री.केसरकर यांनी केली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “विश्व मराठी संमेलनात मराठी भाषाप्रेमींना समाविष्ट करून घ्यावे”