Re-inclusion of seven sports excluded from the list of ‘Shiv Chhatrapati State Sports Awards’
‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’च्या यादीतून वगळलेल्या सात खेळांचा पुन्हा समावेश करण्याचे अजित पवार यांचे निर्देश
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशामुळे गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग, इक्वेस्टेरियन खेळांचा ‘शिवछत्रपती’ यादीत पुन्हा समावेश
-
जिम्नॅस्टिकमधील उपप्रकार ‘एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स’चा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’च्या यादी नव्याने समावेश
-
सन 2022-23च्या शिवछत्रपती पुरस्कारांसाठीचे अर्ज स्विकारण्याची मुदत वाढवून देण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
मुंबई : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता पात्र क्रीडाप्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडाप्रकारांना पुन्हा शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात यावे तसेच जिम्नॅस्टिकमधील उपप्रकार असलेल्या एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीत नव्याने सामावेश करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. यंदाच्या (सन 2022-2023) पुरस्कारांसाठी फेरसमाविष्ट केलेल्या क्रीडा प्रकारातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने तातडीने मागवून तेही विचारात घ्यावेत, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.
राज्य शासनाने अलिकडे जारी केलेल्या सुधारित शासन निर्णयात, गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडाप्रकारांना वगळण्यात आले होते. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या खेळांच्या संघटनांनी त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्याबाबत तसेच त्यांच्या खेळांचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी पात्र क्रीडाप्रकारांमध्ये समावेश करण्याबाबत क्रीडा संचालनालयास पत्रव्यवहार केला होता, त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोणताही खेळाडू तो खेळत असलेल्या क्रीडा प्रकारात यश मिळविण्यासाठी त्याची उमेदीची वर्षे खर्च करतो. आपले सर्वस्व पणाला लावतो. आपल्या कौशल्य, मेहनतीच्या बळावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यासह देशाचे नाव उज्ज्वल करतो. अशा खेळाडूंच्या क्रीडा कामगिरीचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने शिवछत्रपती पुरस्कार देण्यात येतात, त्यामुळे कुठल्याही खेळावर आणि खेळाडूंवर अन्याय होऊन चालणार नाही.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी पात्र असलेल्या 44 खेळांपैकी, वगळण्यात आलेल्या इक्वेस्टेरियन, गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर व यॉटींग या सात खेळांना पुन्हा यादीत सामावून घेण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जिम्नॅस्टिक खेळामधील उपप्रकार असणाऱ्या एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या पात्र यादीत नव्याने सामावेश करण्याचे ठरविण्यात आले. सन 2022-23 या वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यांची मुदत दि. 22 जानेवारीपर्यंतच होती. ही मुदत वाढवून या नव्याने समाविष्ट केलेल्या खेळांसाठीचे अर्ज ऑनलाईन मागविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’च्या यादीतून वगळलेल्या सात खेळांचा पुन्हा समावेश”