Organization of departmental mini saras and district-level sales exhibition Savitri fair under Umed campaign
उमेद’ अभियानाअंतर्गत विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन सावित्री जत्रेचे आयोजन
पुणे : ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद, पुणे यांच्यामार्फत ‘विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन सावित्री जत्रा २०२४’ चे आयोजन २६ ते २८ जानेवारी या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभाग व प्राचार्य प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र मैदान, नवी सांगवी पुणे येथे करण्यात आले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयंसहाय्यता समुहांच्या आर्थिक उन्नतीसाठी समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व खाद्यपदार्थाना बाजारपेठ मिळण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विक्री प्रदर्शने आयोजित करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन सावित्री जत्रेत पुणे, कोकण व छत्रपती संभाजीनगर या ३ विभागातील १८ जिल्हे व पुणे जिल्ह्यातील १३ तालुके सहभाग घेणार असून प्रदर्शनात ८० स्टॉल उभारण्याचे नियोजन आहे.
प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या महिला सदस्यांची सांस्कृतिक स्पर्धा, वक्तृव स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, अभियानांतर्गत गटाचे महत्व, विविध रोजगाराच्या संधीचे महत्व इत्यादी विषयावर आधारित कार्यक्रमात महिला स्वयंसहाय्यता समूह सहभागी होणार आहेत. विविध पुरस्कार वितरण सोहळा व विविध खेळाचे आयोजन हे या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण आहे.
या प्रदर्शनात पुणेकरांना ग्रामीण महिला कारागीर व स्वयंसहाय्यता समुहांतील वस्तुंची उत्पादने व अस्सल ग्रामीण चविष्ट, स्वादिष्ट, रूचकर खाद्यपदार्थाची खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण महिला समुहांनी बनविलेल्या वस्तूंची खरेदी करून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लावावा. नागरिकांनी तसेच सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देवून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “उमेद’ अभियानाअंतर्गत विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन सावित्री जत्रेचे आयोजन”