The Marathi language is the common thread that holds everyone together..!
मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा..! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘विश्व मराठी संमेलन-२०२४’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे : मराठी भाषा ही आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास आहे. मराठी माणसाची धडाडी, संघर्ष सर्वांना ठाऊक आहे. त्यातूनच मराठी माणूस मोठा होतो. या मराठी विश्व संमेलन-२०२४ च्या माध्यमातून जगभरातील मराठी माणसांना एकत्रित येता आले आहे. म्हणूनच मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबई येथे काढले.
विश्व मराठी संमेलन-२०२४ चा उद्घाटन सोहळा नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र या ठिकाणी आज संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले व ते म्हणाले, मराठी भाषा आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले होते. विविध परिसंवाद, नाट्य संमेलन, साहित्य संमेलन अशा विविध माध्यमांतून “माय मराठी” चा गजर सुरू आहे. मराठी भाषेचे महत्त्व वाढविण्यासाठी याचप्रकारे आयोजित करण्यात आलेला मराठी भाषा पंधरवडाही अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला. मराठी भाषेचा वापर वाढत आहे. आजच्या पिढीचा कल मराठी भाषेकडे वळविणे गरजेचे आहे मात्र यासाठी मराठी भाषेच्या लेखकांनी आजच्या पिढीची भाषा ओळखून त्याप्रमाणे साहित्य निर्मिती करायला हवी, त्यातून त्यांच्या मनात मराठी भाषेसाठी आपुलकी निर्माण होईल, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राला देशभरातून तसेच जगभरातून पसंती मिळत आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून 3 लाख 53 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार स्वाक्षरीत झाले आहेत. महाराष्ट्र देशाचे “ग्रोथ इंजिन” आहे. महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगभरात देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. आपली अर्थव्यवस्था जगात दहाव्या क्रमांकावरून आता पाचव्या क्रमांकावर आली आहे आणि आपले ध्येय आहे ते आपली अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी मांडलेली पाच ट्रिलियन डॉलर संकल्पना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान असेल.
महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. याचमुळे परदेशातील अनेक मराठी उद्योजक आपल्या देशात व महाराष्ट्रातही आपले उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य हे शासन करील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा..!”