India will lead the world in affordable and quality treatment
स्वस्त आणि दर्जेदार उपचार पद्धतीसाठी भारत जगाचे नेतृत्व करेल – डॉ. सौम्या स्वामीनाथन
विद्यापीठात ‘बायोलॉजी बियॉन्ड बाऊंडरीज’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्धाटन
डॉ. सायरस पूनावाला यांना लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड
पुणे : विकसनशील देशात कॅन्सर सारख्या असंसर्गजन्य रोगाचे उपचार खुप महागडे आणि सामान्यांच्या आवाक्या बाहेरचे आहेत. त्यामुळे याविषयावर काम करण्याची गरज असून भविष्यात स्वस्त आणि दर्जेदार उपचार पद्धतींसाठी भारत जगाचे नेतृत्व करेल, असे वक्तव्य डब्ल्यूएचओच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘बायोलॉजी बियॉन्ड बाऊंडरीज’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्धाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
या परिषदेचे उद्धाटन सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख व उद्योजक डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ). सुरेश गोसावी, अमेरिकेतील रटगर्स स्कूल ऑफ बायोमेडिकल अँड हेल्थ सायन्सेसचे प्रा. रेमंड बिर्ग, रोझवेल पार्क कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटरचे प्रा. ज्ञान चंद्रा, या परिषदेचे मुख्य आयोजक प्रा.(डॉ) राजेश गच्चे, बायोटेक्नॉलजी विभाग प्रमुख डॉ. स्मिता झिगांर्डे उपस्थित होत्या.
ग्लोबल वॉर्मिंगमचा आपल्या सर्वांवर परिणाम होत असून जैवविविधतेचे होणारे नुकसान, वाढते जागतिकीकरण, शहरीकरण यामुळे भविष्यातील साथीच्या रोगांचा धोका अधिक वाढला असल्याचे डॉ. स्वामीनाथन यांनी यावेळी सांगितले. तसेच यापासून बचाव करायचा असेल तर याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. लोकसंख्या, अन्न व्यवस्था, पाणी आणि हवेची गुणवत्ता, राहणीमान या सगळ्यांवर काम करावे लागणार अल्याचेही डॉ. स्वामीनाथन यावेळी म्हणाल्या. यावेळी बोलताना त्यांनी आरोग्य क्षेत्रातील एआयचे महत्त्वही अधोरेखित केले.
विद्यार्थी ते ‘ ‘व्हॅक्सिन किंग’पर्यंतचा प्रवास
डॉ. सायरस पूनावाला यांनी त्यांचा विद्यार्थी ते ‘ ‘व्हॅक्सिन किंग’पर्यंतचा प्रवास भाषणात उलगडला. तसेच नुकतेच यूएस एफडीएने आम्हाला मंजूरी दिली आहे. मागच्या महिण्यात आपण लसींचे लाखो डोस यूएसला पुरवले असून यूएसला लस पुरवणारी सिरम ही पहिली भारतीय कंपनी असल्याचे डॉ.पूनावाला यांनी यावेळी सांगितले. तर औषधी आणि लस बनविण्यासाठी भविष्यात एआयची मदत होणरा असल्याचे सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यावेळी म्हणाले. यावेळी कुलगुरू डॉ. गोसावी यांनी या परिषदेचे महत्त्व सांगताना सार्वजनिक आरोग्यावर होत असलेल्या संशोधनात विद्यापीठाच्या योगदानाबद्दल माहिती दिली.
विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाचा बायोटेक्नॉलजी विभाग, अमेरिकेतील रटगर्स स्कूल ऑफ बायोमेडिकल अँड हेल्थ सायन्सेस आणि रोझवेल पार्क कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. २९ ते ३१ जानेवारी दरम्यान ही परिषद होणार आहे.
माइटोकॉन्ड्रिया, सेल डेथ आणि मानवी रोग, मानवी रोग व्यवस्थापनातील संगणकीय यश आणि आरोग्यसेवेतील मूलभूत आणि वैद्यकीय संशोधन आणि परिवर्तन या सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये अलीकडील प्रगती अधोरेखित करणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातून ५० हून अधिक शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. ज्यात प्रा. एड्रियन हिल (कोविशील्ड लस शोधक, ऑक्सफर्ड विद्यापीठ), डॉ. पॅट्रिक डफी (मलेरिया लस शोधक), डॉ. एलिझाबेथ उंगेर (प्रमुख, सीडीसी, यूएसए) यांसारखे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ तर डॉ. रॉबर्ट सेडर (NIAAID, NIH, बेथेस्डा यूएसए), माईक मॅकक्यून (बिल गेट्स फाऊंडेशन) इत्यादी प्रतिष्ठित जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित मान्यवर या परिषदेत सार्वजनिक आरोग्याविषयी चर्चा करणार आहेत.
डॉ. सायरस पूनावाला यांना लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड
जागतिक सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्यामुळे डॉ. सायरस पूनावाला यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड’ देण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी यांच्या हस्ते डॉ. पूनावाला यांना हा अवॉर्ड प्रदान केल्या गेला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “स्वस्त आणि दर्जेदार उपचार पद्धतीसाठी भारत जगाचे नेतृत्व करेल”