The Jewish religion has contributed a lot to the creation of modern Mumbai
आधुनिक मुंबईच्या निर्मितीमध्ये ज्यू धर्मियांचे योगदान मोठे – राज्यपाल रमेश बैस
मुंबई : पारशी समाजाप्रमाणेच आधुनिक मुंबईच्या निर्मितीमध्ये ज्यू धर्मियांचे योगदान मोठे आहे. मुंबईचा इतिहास व येथील सुंदर वास्तूंच्या निर्मितीमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे. या समाजातील उद्यमशील व दानशूर लोकांनी मुंबई, पुणे व इतरत्र निर्माण केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व तंत्रशिक्षण संस्था आज देखील समाजातील सर्व सामाजिक – आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना सेवा देत आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मारल्या गेलेल्या लाखो ज्यू धर्मीय लोकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘इंटरनॅशनल होलोकॉस्ट रेमेब्रन्स डे‘ निमित्त मुंबईतील ज्यू धर्मियांचे प्रार्थनास्थळ असलेल्या केनिसेथ इलियाहु सिनेगॉग येथे राज्यपाल श्री. बैस यांच्या उपस्थितीत प्रार्थना सभा झाली. यावेळी अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी, जर्मनीचे वाणिज्यदूत एकिम फैबिग, इस्रायलचे वाणिज्यदूत कोबी शोशानी, विविध देशांचे वाणिज्यदूत, जेकब ससून ट्रस्टचे अध्यक्ष व ज्यू समाजाचे नेते सॉलोमन सोफर, संगीता जिंदाल, तसेच ज्यू समाज बांधव उपस्थित होते.
युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्ध काळात ६० लाख ज्यू धर्मीय लोकांना अतिशय क्रूर पद्धतीने मारण्यात आले. अशा अमानवीय कृत्याचे दुसरे उदाहरण जगात सापडणार नाही. भारत जगातील निवडक देशांमधील एक देश आहे, जेथे ज्यू धर्मियांचे खुलेपणाने स्वागत करण्यात आले व त्यांना त्यांच्या चालीरीती व धर्म आचारण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. ज्यू धर्मियांची प्रार्थनास्थळे भारताच्या सर्वधर्म समभावाचे उदाहरण आहे, असे सांगताना ज्यू समाजातील सामाजिक व आर्थिक मागासलेल्या लोकांचे आर्थिक कल्याण करण्यासाठी तसेच त्यांचा वारसा जतन करण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी अमेरिका, जर्मनी, इस्रायल येथील वाणिज्यदूतांची तसेच बगदादी ज्यू समाजाचे नेते सॉलोमन सोफर यांची समयोचित भाषणे झाले. सुरुवातीला मृतात्म्यांसाठी प्रार्थना करण्यात आली व श्रद्धांजली वाहण्यात आली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “आधुनिक मुंबईच्या निर्मितीमध्ये ज्यू धर्मियांचे योगदान मोठे”