The dream of a developed India will be fulfilled through the efforts of agricultural universities
विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठांच्या प्रयत्नांतून पूर्ण होणार – राज्यपाल रमेश बैस
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा ३७ वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात संपन्न
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र बारवाले आणि विलास शिंदे यांना डॉक्टर ऑफ सायन्स मानद पदवी प्रदान
अहमदनगर : सन 2047 चा विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषी विद्यापीठांच्या प्रयत्नातून व या विद्यापीठातून पदवी घेतलेले कृषी पदवीधर आपल्या ज्ञान व कौशल्यानेच साकार करतील, असा विश्वास राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केला.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात 37 व्या पदवीप्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी स्नातकांना राज्यपाल रमेश बैस हे दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना बोलत होते.
राज्यपाल रमेश बैस म्हणाल की, कृषि हा आपल्या देशाचा मुख्य आधार असुन 58 टक्के पेक्षा जास्त लोक कृषिक्षेत्राशी निगडीत आहेत. या कृषिक्षेत्राच्या भविष्याला आकार देण्यासाठी कृषि विद्यापीठांची भूमिका महत्वाची असणार आहे. कृषि विद्यापीठातून केवळ पदवी घेतलेले पदवीधर विद्यार्थी नसुन तुम्ही नवपरिवर्तनाचे अग्रदुत आहात. महाराष्ट्राला कृषिची समृध्द अशी परंपरा लाभलेली असून ही परंपरा सर्मपक भावनेने जपण्यासाठी तुम्हाला संधी मिळालेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे जीवन पुर्णपणे शेतीवर अवलंबून आहे अशा लोकांचे जीवन समृध्द बनविण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहनही राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केले.
राज्याचे कृषि मंत्री तथा कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती धनंजय मुंडे यांचा संदेश कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी वाचून दाखवला. त्यांच्या संदेशात कृषि मंत्री म्हणाले कृषि क्षेत्रात डिजीटल तंत्रज्ञानामुळे अधिक प्रगती होत आहे. यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा मोलाचा वाटा आहे. सध्या कृषि क्षेत्र हे बदलत्या हवामानाला सामोरे जात आहे. या बदलत्या हवामानाला सामोरे जातांना शाश्वत शेतीसाठी सरकार प्रयत्नशील आहे. मानद डॉक्टर पदवी मिळालेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र बारवाले, विलास शिंदे व पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदनही केले.
डॉ. आर.एस. परोदा म्हणाले की, सन 2030 सालापर्यंत आपल्या देशात एकही गरीब नसणे व कोणीही उपाशी राहणार नाही हे सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे. त्याचबरोबर वातावरणातील बदलाला सामोरे जाणे, पाणी व जमीन या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास थांबविणे, सामाजिक व आर्थिक विषमता दुर करणे ही आपल्या समोरील मोठी आव्हाने आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी पायाभुत सुविधांचा विकास, नविन तंत्रज्ञान, पारदर्शक योजना व संस्थापक यंत्रणा या चार मुद्द्यांवर काम करावे लागणार आहे. भविष्यातील शेती ही डिजीटल तंत्रज्ञानावर आधारीत असणार आहे. विद्यापीठ आपल्या संशोधनामध्ये ड्रोन, आय.ओ.टी. व सेंसर्सवर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर करीत असून यातील संशोधनामुळे शेतकऱ्यांना शेती करणे सुलभ होणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.
राज्यपाल तथा कृषि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या वतीने कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते राज्याचे महसल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र बारवाले व विलास शिंदे यांनी कृषि क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी कुलगुरु डॉ. पाटील यांनी मानपत्रांचे वाचन केले. 73 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 300 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 6 हजार 522 विद्यार्थ्यांना पदवी असे एकुण 6 हजार 895 पदव्या प्रदान करण्यात आल्या. पदवीदान समारंभात सन 2022-23 मध्ये बी.एस्स.सी (कृषि) पदवीत प्रथम आलेली कु. पुजा नवले, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली कु. ऐश्वर्या कदम, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेली कु. गौरी चव्हाण यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठांच्या प्रयत्नांतून पूर्ण होणार”