Unpublished literature on great men should be published
महापुरुषांवरील अप्रकाशित साहित्य प्रकाशित करावे
– उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले आदी महापुरुषांवर कथा, कादंबऱ्या, लेख, चरित्र लेखन या स्वरूपात साहित्य उपलब्ध आहे. मात्र, अद्यापही संशोधन, अभ्यास करून त्यांच्यावरील साहित्य किंवा तत्कालिन वृत्तपत्रीय लेखन एकसंध उपलब्ध नाही किंवा असे साहित्य लोकापर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे चरित्र साधने प्रकाशन समित्यांनी संबंधित महापुरूषांवरील अप्रकाशित साहित्याचा शोध घेऊन त्याचे प्रकाशन करून लोकांपर्यंत आणावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या सभागृहात महापुरुषांवरील विविध चरित्र साधने प्रकाशन समित्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.
सर्व प्रकाशन समित्यांना पुणे येथे जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देत मंत्री श्री. पाटील म्हणाले, मध्यवर्ती ठिकाणी सर्व समित्यांची कार्यालये, कॉन्फरन्स हॉल, बैठक व्यवस्थेसह एकच कार्यालय विकसित करण्यात यावे. यामध्ये डिजिटलायझेशनची व्यवस्था असावी. जोपर्यंत स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत उच्च शिक्षण संचालक कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलचा बैठकांसाठी उपयोग करण्यात यावा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जवळपास 61 दिवस रशियामध्ये राहिले आहेत. त्यांच्या रशियातील वास्तव्याचा शोध घेऊन तत्कालिन घटना, कार्याचा अभ्यास करावा आणि साहित्यामध्ये समावेश करावा. त्यांच्यावरील जे साहित्य अप्रकाशित आहे, त्यांचा एक खंड प्रकाशित करावा.
मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, लोकसाहित्य प्रकाशन समितीच्या माध्यमातून पहिले लोकसाहित्य संमेलन आयोजित करण्याचे समितीने नियोजन करावे. त्यासाठी प्रस्ताव शासनास पाठवावा. सर्व महापुरूषांवरील समितीच्या माध्यमातून आलेल्या साहित्याचे अवलोकन करणारी पुणे विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापकांची यंत्रणा उभारण्यात यावी. राजर्षी शाहू महाराज यांच्यावरील तत्कालिन वर्तमानपत्रांमध्ये आलेले त्यांचे लेख, वृत्त, यांचा संग्रह करून खंड प्रकाशित करावा. त्यासाठी आर्थिक तरतूद मागणीचा प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी समित्यांचे सदस्य, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “महापुरुषांवरील अप्रकाशित साहित्य प्रकाशित करावे”