A proposal should be prepared for the training of tribal farmers for beekeeping
आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षणाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश
डॉ.तुकाराम निकम यांच्या ‘इस्रायलची सदाहरीत मधुक्रांती’ या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : आदिवासी भागातील शेतकरी, युवक आणि महिलांना रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ तयार करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले.
मंत्रालयात मंत्री डॉ.गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज आदिवासी समुहांसाठी मधुमक्षिका पालन व्यवसाय प्रशिक्षणाबाबत बैठक झाली.
मंत्री डॉ.गावित म्हणाले, मधुमक्षिका पालन व्यवसायाचे प्रशिक्षण आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना टप्प्या-टप्प्याने देण्यात येणार आहे. प्रत्येक गावातून या प्रशिक्षणासाठी 10 लाभार्थीची निवड करण्यात येईल. विद्यापीठामार्फत निवड झालेल्या लाभार्थ्यांना 5 दिवसांचे उद्योजकता आधारित कौशल्य विकास निवासी प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच लाभार्थीना प्रत्येकी मधुमक्षिका पेट्यांचे वाटप करण्यात येईल.
मध आणि त्याच्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत आहे. मध आणि मेण ही मधमाशी पालनातून मिळणारी दोन आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची उत्पादने आहेत. मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात. मध आणि त्याच्या उत्पादनांची मागणी यामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन मिळेल, असेही मंत्री डॉ.गावित यांनी सांगितले.
डॉ. तुकाराम निकम यांच्या ‘इस्रायलची सदाहरीत मधुक्रांती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, आदिवासी विकास विभागाचे उपसचिव मच्छिंद्र शेळके, प्रकल्प संचालक डॉ. तुकाराम निकम, डॉ. नितीन ढोके उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com