Speed up the process of filling up the vacancies in the Health Department
आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग
मंत्री डॉ.तानाजी सावंत यांचा पुढाकार
मुंबई : आरोग्य विभागात रिक्त पदांमुळे रूग्णसेवेवर परिणाम होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास येत होते. त्यामुळे आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणेबाबत राज्य शासन कायमच सकारात्मक राहिले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया वेगाने सुरू असून रिक्त पदांवरील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरतीमुळे सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवरील भार हलका होणार आहे.
गतवर्षी 28 ऑगस्ट 2023 रोजी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आरोग्य विभागातील गट ‘क’ व ‘ड’ संवर्गातील एकूण 10 हजार 949 पदांसाठी घेण्यात आलेल्या पदभरतीमध्ये रिक्त पदांकरीता पात्र उमेदवारांची 30 नोव्हेंबर 2023 ते 7 डिसेंबर 2023 व दिनांक 12 डिसेंबर 2023 दरम्यान परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये 10 संवर्गातील पदे आहेत. यामध्ये आहारतज्ज्ञ, कनिष्ठ अवेक्षक, रेडिओग्राफी तंत्रज्ञ, नळ कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, दंत आरोग्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृह नि वस्त्रपाल, ग्रंथपाल आदी पदांचा समावेश आहे. या पदांची अंतरिम निवड, प्रतिक्षा याद्या व गुणवत्ता याद्या 2 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
या 10 संवर्गातील नियुक्ती 8 फेब्रुवारी पर्यंत करण्यात येणार असून, उर्वरीत संवर्गातील अंतरिम निवड यादी व प्रतिक्षा यादी 8 दिवसात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नियुक्त्या लवकरच देण्यात येणार आहेत. एकूणच भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी मंत्री डॉ. सावंत यांनी भरतीचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत वेळोवेळी बैठक घेऊन तसे निर्देशही दिले होते.
मंत्री डॉ. सावंत यांच्या पुढाकाराने आणि निर्देशानुसार ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे करण्यात आली आहे. या सरळ सेवा भरतीसाठी टीसीएस या एजन्सीची निवड करण्यात आली होती. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी टिसीएसकडून सीसीटिव्ही रेकॉर्डिंग, बायोमेट्रीक्स हजेरी, आयरीस तपासणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. तसेच ईलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. (ईसीआयएल) यांच्याकडून परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेच्या कालाधीत 5-जी मोबाईल जॅमर्सची व्यवस्थाही करण्यात आली होती.
मंत्री प्रा. डॉ. सावंत यांच्या निर्देशानुसार ही पद भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नोडल अधिकारी व प्रत्येक परीक्षा केंद्राकरिता एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत परीक्षेचे पर्यवेक्षण करण्यात आलेले आहे. या प्रक्रियेत विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी व टिसीएस चे प्रतिनिधी यांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतलेली आहे.
गेल्या पाच वर्षात प्रथमच एकूण 10 हजार 949 पदांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या या सर्व जागा भरणे आरोग्यमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाल्या आहेत. या मेगा भरतीच्या पूर्ततेनंतर मनुष्यबळाअभावी आरोग्य व्यवस्थेवर पडत असलेला ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच राज्यातील नागरिकांना विनाविलंब व सुलभ आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग”