Ms. Aditi Tatkare, Minister of Women and Child Development inaugurated the biogas generation project at Sri Kshetra Ozar.
महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते श्री क्षेत्र ओझर येथे बायोगॅस निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन
पुणे : महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते बुधवारी (ता. ६) जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टमार्फत उभारण्यात आलेला बायोगॅस निर्मिती प्रकल्प, संगीत विद्यालय आणि सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून येडगाव आणि माणिकडोह धरणामध्ये बोटिंग सुरु करण्याबाबत विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे कु.तटकरे यावेळी म्हणाल्या.
कार्यक्रमाला आमदार अतुल बेनके, संग्राम जगताप, तहसीलदार रवींद्र सबनीस, श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, संचालक संतोष खैरे, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा बुचके, मोहित ढमाले आदी उपस्थित होते.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, राज्यातील अष्टविनायकांचे सुशोभिकरण, सौदर्यीकरण, मंदिराची डागडुजी करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला असून शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र ओझरकरीता ४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून पुरातत्व विभागाशी समन्वय साधून पारंपरिक स्वरुपाला धक्का न लावता कामे करण्यात येत आहेत. अष्टविनायकांपैकी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र ओझर हे महत्वाचे स्थान म्हणून ओळखले जात असून देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात येणाऱ्या कामांसाठी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही कु. तटकरे यांनी दिली.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट यांनी संयुक्तरित्या सुरू केलेल्या संगीत विद्यालयातून विद्यार्थी संगीत क्षेत्रात उत्तम यश मिळवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाळेची इमारत सुसज्ज असावी, विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळ चांगले प्रयत्न करीत असल्याचे कु.तटकरे म्हणाल्या.
श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्यावतीने देवस्थानसाठी विकासाचे चांगले उपक्रम राबविले आहेत, असे सांगून आमदार श्री. बेनके म्हणाले, राज्य शासनाने जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी सुरु करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्यामुळे परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल.
श्री. कवडे यांनी मंत्री कु. तटकरे यांना देवस्थान ट्रस्टच्यावतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या महाप्रसादालय, वाचनालय तसेच विविध विकासकामांची व सोई-सुविधांची माहिती दिली.
श्री क्षेत्र ओझर देवस्थान ट्रस्टमार्फत चालविण्यात येणाऱ्या अन्नछत्रालयामध्ये प्रती वर्षी ४ ते ५ लाख भाविक अन्न प्रसादाचा लाभ घेतात. परिसरात असणारे हॉटेल व्यावसायिक व अन्नप्रसादालयामधून दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यापासून इंधन निर्मिती करण्याकरिता देवस्थान ट्रस्टमार्फत भाभा अनुसंधान संशोधन केंद्राचे तंत्रज्ञान वापरून बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “श्री क्षेत्र ओझर येथे बायोगॅस निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन”