Instructions to submit a proposal for Sri Kshetra Mahabaleshwar, Pratapgad, Sahyadri Tiger Reserve Tourism Development Plan immediately
श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्याचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुरातन मंदिरे तसेच वास्तू यांच्या रचना लक्षात घेऊन नवीन कामे प्रस्तावित करावी
मुंबई : पर्यटन विकास आराखड्यामध्ये महाबळेश्वर, प्रतापगड, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यानुसार कामे करताना मूळ वास्तू आणि परिसराच्या सुशोभीकरणाची कामे नैसर्गिक रंग वापरून, बांधकामाचे साहित्य देखील पर्यावरण पूरक वापरण्यावर भर दिला जाईल, या परिसराचे मूळ सौंदर्य राखले जाईल, अशी कामे प्रस्तावित करावीत. प्रशासनाने हे प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या दालनात श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड, निसर्ग पर्यटन विकास आराखडा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्याबाबतची आढावा बैठक आज झाली. या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, वित्त विभागाच्या सचिव ए.शैला, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी , पुरातत्व विभागाचे उपसंचालक हेमंत दळवी आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, प्रतापगड किल्ला जतन आणि संवर्धन या बाबी लक्षात घेऊन गडावर जाणारे व येण्याचे मार्ग, बुरुज व तटबंदी बांधकाम, किल्ल्यावर झालेल्या पडझडीच्या दुरुस्तीची कामे, पर्यटकांसाठी सोयीसुविधा या सर्व कामांचा पर्यटन विकास आराखड्यामध्ये समावेश करावा. किल्ल्याचे मूळ सौंदर्य कोणत्याही प्रकारे खराब दिसू नये याची खबरदारी घ्यावी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पर्यटन विकासाची कामे करताना या परिसरातील जैवविविधता राखली जावी. स्थानिक कृषी पर्यटनाला चालना मिळावी, स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या गोष्टी लक्षात घ्याव्यात.
श्रीक्षेत्र महाबळेश्वर पर्यटन विकास करताना स्थानिक ठिकाणी असलेली पुरातन मंदिरे तसेच वास्तू यांच्या रचना लक्षात घेऊन नवीन कामे प्रस्तावित करावी. जी कामे करणार ती गुणवत्तापूर्ण करून, परिसराचे सुशोभीकरणासाठी पुरातन वास्तूंची रचना लक्षात घेऊन त्याच प्रकारे कामे करावीत. किल्ले विकसित करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान दीर्घकाळ टिकणारे असावे, याची दक्षता घ्यावी. श्री क्षेत्र महाबळेश्वर मध्ये असलेली पुरातन मंदिर, नद्या आणि आजूबाजूचा परिसराची कामे करताना स्थानिकांच्या सूचना विचारात घ्याव्यात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये कायम टिकणारे पर्यटन विषयक कार्यक्रम राबवावा. राजस्थान, केरळ राज्याप्रमाणे पर्यटन महोत्सव राबवा. पर्यटन फेस्टिवलच्या दिनदर्शिकेमध्ये कांदाटी फेस्टिवलचा देखील समावेश करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
आमदार श्री. भोसले यांनी प्रतापगडावरील पाणीटंचाई दूर करावी. श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड किल्ला, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देत ही कामे गतीने करण्याबाबतच्या सूचना केल्या.
साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण केले. या प्रकल्पांतर्गत राबवण्याच्या संभाव्य उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. या परिसराचा विकास करताना स्थानिक ठिकाणी रोजगार निर्माण करण्यासाठी पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्याचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश”